Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाला धक्का, नवज्योत कौरला कोरोनाची लागण
Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर नवज्योत कौरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नवज्योतला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकाच्या आशेवर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघावार कोरोनाचे (Corona) सावट आहे. संघाची मिडफिल्डर नवज्योत कौरची (Navjot kaur) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नवज्योतला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या दिवशी घानावर 5-0 असा विजय मिळवला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार नवज्योत कौरला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पहिल्या चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. मात्र, आयसोलेशननंतर तिला भारतात परत पाठवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महिला क्रिकेट संघातील पूजा वस्त्राकर आणि एस मेघना यांनाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्या दोघीही कोरोना मुक्त झाल्या असून एस मेघना टीम इंडियामध्ये सामील झाली आहे. तर पूजा 3 ऑगस्टच्या सामन्यापूर्वी संघात सामील होईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला, राष्ट्रकुल खेळांच्या आयोजकांनी एका निवेदनात म्हटले होते की, स्पर्धेच्या ठिकाणी रोज दहा ते बारा कोरोना रूग्णांची नोंद होत आहे. कोरना महामारी सुरू झाल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेले राष्ट्रकुल ही पहिलेच स्पर्धा आहे.
पहिल्या सामन्यात दमदार विजय
भारत विरुद्ध घाना सामन्यात सुरुवातीपासून भारताने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. सुरुवातीच्या काही मिनिटांतच संघातील एक अनुभवी खेळाडू असणाऱ्या गुरजीत कौरने अप्रतिम गोल करत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने एक-एक करत घानाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवणं कायम ठेवलं. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत भारतीय महिला गोल करत होत्या. अखेरच्या काही मिनिटांत सलिमा टेटे हिने गोल करत भारताची आघाडी 5-0 वर पोहोचवली. ज्यानंतर सामन्याची वेळ संपली आणि भारत 5-0 ने विजयी झाला. यावेळी सामन्यात गुरजीत कौरने सर्वाधिक 2 तर नेहा गोयल, संगीता कुमारी आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. आताभारत उद्या अर्थात 30 जुलै रोजी वेल्सविरुद्ध आपला दुसरा ग्रुप सामना खेळेल.
























