Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी
FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कांस्य पदक मिळवलं असून युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं.
![Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी Chess Olympiad 2022 Indian women who made history in Chess Olympiad by winning Bronze medal Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/10/8934d64a1b8b1a5ab0b8243af8b27c941660139823343323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली. दरम्यान या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. कायम कमी लेखल्या जाणाऱ्या भारतीय महिलांनी प्रथमच यंदा पदक जिंकत इतिहास रचला आहे. यामध्ये कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करुन दाखवली आहे.
यंदा रशिया आणि चीन हे दिग्गज संघ स्पर्धेत सहभागी नव्हते. या दोघांनीही ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला नाही. दरम्यान यावेळी भारतीय संघ सुरुवातीपासून सुवर्णपदकाच्या शर्यतीत चांगल्या लयीत होता. पण अंतिम फेरीत प्रवेशापूर्वीच त्यांना युएसएकडून 3-1 ने पराभव मिळवावा लागला. यावेळी तानिया आणि भक्ती यांनी त्यांच्या बाजी मारली तर हंपी आणि वैशालीचे सामने अनिर्णीत सुटले. शेवटच्या फेरीपर्यंत 10 गेममधील आठ गुणांसह अपराजित असलेल्या तानियाला शेवटच्या दिवशी मात्र विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तिला अमेरिकेच्या कॅरिसा यिपकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर तानियाने दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणाली, "मला वाटते की ऑलिम्पियाडसाठी पहिले पदक जिंकण्यासाठी मोठी मेहणत करावी लागते हे फार कठीण आहे. मला वाटते की ही स्पर्धा ज्या प्रकारे पुढे जात होती तेव्हा आम्ही आघाडीवर होतो. पण आता आम्ही सुवर्णपदकाच्या शर्यतीत नसून कांस्य मिळवलं आहे. आम्ही आता कांस्य जिंकल्याहून सुवर्णपदक गमावल्याचा सामना करत आहोत."
भारत-अमेरिकेत चुरशीची लढत
विशेष म्हणजे या स्पर्धेत युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं असून या दोघांविरुद्ध भारताने सामने गमावले नव्हते. त्यामुळे भारत गोल्ड मिळवले अशी शक्यता होती. पण अखेरच्या काही राऊंडमध्येतर भारत कांस्य पदक मिळवेल का? ही देखील शंका होती. पहिलं आणि दुसरं स्थान युक्रेन आणि जॉर्जिया यांनी मिळवलं होतं. पण तिसऱ्या स्थानासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात तगडी टक्कर होती. पण अखेर आकडे भारताच्या दिशेने झुकले आणि भारतीय महिलांनी कांस्य पदकावर नाव कोरलं.
पुरुषांच्या 'बी' संघालाही कांस्य
दुसरीकडे भारताच्या पुरुष गटातील बी संघानेही कांस्य पदक मिळवत आणखी एका पदकाला गवसणी घातली. डी. गुकेश नेतृत्त्व करणाऱ्या या संघात आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन, रौनक साधवानी, बी. अधिबन असे तगडे खेळाडू होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दमदार खेळाने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. अखेरच्या सामन्यातही जर्मनी संघाला 3-1 ने मात देत भारताच्या बी संघाने कांस्य पदक खिशात घातलं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)