Brian Lara Birthday : वेस्ट इंडीजचा (West Indies) दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) याचा आज 54 वा वाढदिवस आहे. त्यानं वेस्ट इंडीजच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम लाराच्या नावावर आहे. अद्याप कोणत्याही खेळाडूला हा विक्रम मोडता आलेला नाही. लाराने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.


ब्रायन लाराचा 54 वा वाढदिवस 


दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. त्याचा जन्म 2 मे 1969 कॅरेबियन देश त्रिनिदाद येथे झाला. लाराने अनेक खेळाडूंचे विक्रम मोडीतही काढले आहेत. पण 1994 मध्ये ब्रायन लाराने रचलेल्या विक्रमाची बरोबरी अद्याप कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. 


ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, 501 धावांची नाबाद खेळी


डावखुऱ्या फलंदाज लाराने 6 जून 1994 रोजी काउंटी क्रिकेटमध्ये 501 (Brain Lara 501 Not Out) धावांची नाबाद खेळी खेळली. ब्रायन लाराने बर्मिंगहॅमच्या मैदानावर इंग्लिश काऊंटी संघ वॉरविकशायरसाठी (Warwickshire County Cricket Club) 501 धावांची नाबाद खेळी करत इतिहास रचला. त्याने डरहम काउंटी क्रिकेट क्लब (Durham County Cricket Club) विरुद्धच्या सामन्यात ही धडाकेबाज खेळी खेळली. डरहम आणि वॉर्विकशायर यांच्यातील काऊंटी सामना अनिर्णित राहिला.


ब्रायन लाराची कारकिर्द


ब्रायन लारानं त्याच्या कारकिर्दीत 133 कसोटी आणि आणि 299 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटीत 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा केल्या आहेत. ज्यात दोन द्विशतकाचाही समावेश आहे. त्यानं 1994 मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 आणि 2004 मध्ये 400 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. कसोटी क्रिकेटमध्ये 400 करण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रायन लाराच्या नावावर 10 हजार 405 धावांची नोंद आहे. ज्यात 19 शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 53 शतकांसह 22 हजार 358 धावा केल्या आहेत.


'या' दिग्गजांचा विक्रम मोडला


501 धावांच्या नाबाद खेळीमुळे त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. लाराच्या आधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ग्रॅम हिक (नाबाद 405 धावा), आर्ची मॅक्लारेन (424 धावा), आफताब ब्लोच (428 धावा), बिल पॉन्सफोर्ड (429 धावा), बिल पॉन्सफोर्ड (437 धावा), बीबी निंबाळकर (नाबाद 443 धावा), सर डॉन ब्रॅडमन (नाबाद 452 धावा) आणि हनिफ मोहम्मद (499 धावा) या खेळाडूंच्या नावावर होत्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पुन्हा बाचाबाची, वादामुळेच गाजला LSG vs RCB सामना, व्हिडीओ व्हायरल