LSG vs RCB, IPL 2023 : इकाना स्टेडिअमवर लखनौचा पराभव करत आरसीबीने हिशोब चुकता केला. कमी धावसंख्येच्या सामन्यात आरसीबीने बाजी मारली पण या सामन्यात विराट कोहलीचा जोश, उत्साह चाहत्यांना पाहायला मिळाला. बेंगलोरमधील पराभवानंतर लखनौच्या खेळाडूंकडून केलेल्या जल्लोषावरुन आज वातावरण चांगलेच तापले होते.  लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादाचे नेमके कारण अद्याप समजले नाही... पण या वादाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. कुणी या वादाला बेंगलोरमधील मैदानावर झालेल्या प्रकारासोबत जोडलेय.. विराट कोहलीने हिशोब चुकता केलाय.. असेही नेटकरी म्हणत आहे. 



लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. प्रत्येक सामन्यानंतर जणू बेंगलोरमधील पराभवाचा वचपा काढत होता. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. त्यानंतर वातावरण पुन्हा गरम झाले. त्यानंतर मॅक्सवेल याने मध्यस्थी करत हा वाद सोडवला. पण त्यानंतर पुन्हा लखनौच्या फिल्डर्सकडून विराट कोहलीला हुसकवले गेले.. त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. अखेर अमित मिश्रा याने मध्यस्थी करत वाद सोडवला. या वादाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.