मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने फर्मान बजावलं आहे. कोहलीला ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात ओएनजीसीचं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.

'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट'च्या मुद्द्यावरुन यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यासारखे दिग्गजांनाही अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विराट कोहलीचा नंबर आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने कोहलीला ओएनजीसीचं मॅनेजरपद सोडण्यास सांगितलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या क्रिकेटर्सना त्या-त्या नोकऱ्या सोडण्यास सांगा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला दिला होता.

त्यानुसार क्रिकेट प्रशासक समितीने, कोणताही क्रिकेटर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचं कोणतंही पद भूषवणार नाही, असं बोर्डाला स्पष्ट शब्दात सांगितलं.

कोहलीने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये ओएनजीसीचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे त्याची वर्णी ओएनजीसीच्या मॅनेजरपदी लागली होती.

कोहलीशिवाय बीसीसीआयने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या, जवळपास 100 भारतीय क्रिकेटपटूंना कडक इशारा दिला आहे.

भारतीय क्रिकेटपटून बीएसएनएल, इंडियन ऑईल, एचपीसीएल, एअर इंडिया, रेल्वे, ओएनजीसी अशा विविध कंपन्यांच्या मानद पदांवर आहेत.