गुडघाभर चिखलात झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हातात नांगर!
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2017 08:47 AM (IST)
मधु कोडा नाव तुमच्या लक्षात आहे का? जे अपक्ष आमदार होते आणि नंतर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. पण आता मधु कोडा शेतात राबत आहेत.
A
रांची : मधु कोडा नाव तुमच्या लक्षात आहे का? जे अपक्ष आमदार होते आणि नंतर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. पण आता मधु कोडा शेतात राबत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा चक्क शेती करत आहेत. चार हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 3 वर्षे 8 महिन्याचा कारावास सोसल्यानंतर मधु कोडांची जामीनावर सुटका झाली. आता ते चक्क शेतात मशागत करत आहेत. पश्चिम सिंहभूमी जिल्ह्यातील पाताहातू या मूळगावी हातात नांगर घेतलेल्या मधु कोडा यांची सध्या जोरदार चर्चा आहे. अपक्ष आमदार असूनही झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री झालेले मधु कोडा एकाएकी प्रकाशझोतात आले होते. मात्र चार हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. 3 वर्ष 8 महिन्यांशी शिक्षा भोगलेले कोडा सध्या जामीनावर जेलबाहेर आहेत. मधु कोडा यांची राजकीय कारकीर्द मधु कोडा यांचा राजकीय कारकीर्दीची सुरुवात झारखंड स्टुडंट युनियनचा एका कार्यकर्ता म्हणून झाली होती. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही सहभागी झाले. 2000 च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत जगन्नाथपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. बाबूलाल मरांडी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर 2003 मध्ये अर्जुन मुंडा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही कोडांचं मंत्रालयक कायम होते. 2005 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास नकार दिला. यानंतर ते अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील अर्जुन मुंडा यांच्या सरकारला त्यांनी बाहेरुन पाठिंबा दिला. या मोबदल्यात खाण मंत्रालय मिळालं. सप्टेंबर 2006 मध्ये कोडा आणि इतर तीन अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढला, ज्यामुळे सरकार अल्पमतात आलं. यानंतर विरोधकांच्या महाआघाडीने मधु कोडा यांना मुख्यमंत्री बनवून सरकार स्थापन केलं. पाहा व्हिडीओ