मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची 31 जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी पेपर तपासण्याची चांगलीच कसोटी सुरु आहे. त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी प्राध्यापकांना घाईघाईनं पेपर तपासण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप होत आहे.


मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी हा आरोप करत तशी पोस्टच फेसबुकवर लिहिली आहे.

सोयीसुविधा आणि नियोजनाच्या अभावी प्राध्यापक काम करत असताना प्राध्यापकांना धमकावण्यात येत असल्याचं, हातेकरांनी म्हटलं आहे.

"विद्यापीठाने जे सर्क्युलर काढलंय ते प्राध्यापकांना प्रेरणा देणारं आहे, मात्र विनायक दळवी यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 6 तास काम न करणाऱ्या प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण बरेच प्राध्यापक खूप काम करत आहेत, रविवारी येऊन काम करत आहेत. त्यांच्यामुळेच निकाल आटोक्यात आले आहेत. मात्र अशा प्रकारची वक्तव्यं करणं चुकीचं आहे", अशी प्रतिक्रिया नीरज हातेकर यांनी 'एबीपी माझा'ला दिली.

विद्यापीठ प्राध्यापकांचं अभिनंदन करतंय, मात्र माध्यमांतून हे अशी वक्तव्यं करणार असतील, तर विनायक दळवींनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी नीरज हातेकर यांनी केली आहे.