मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीमध्ये काहीतरी वाद असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात विराटने पत्रकार परिषदेत केलेल्या काही खुलाशानंतर तर काहीतरी वाद असल्याचं जवळपास स्पष्ट झालं होतं. दरम्यान या मुद्द्यावर बीसीसीआय किंवा अध्यक्ष सौरव गांगुली याने अधिकृत काही वक्तव्य केलं नव्हतं. पण आता सौरव गांगुली यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना 'विराटचा स्वभाव चांगला आहे, पण आजकाल भांडण खूप करतो' अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.


काय आहे वाद?


एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराटकडून रोहितकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराटच्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष होतं. ज्यानंतर विराटने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने बरेच खुलासे केले. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदिसीय संघाचं कर्णधारपद माझ्याकडून काढून घेताना कोणतीच चर्चा झाली नव्हती. आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघाच्या चर्चेबाबत फोन केला असता शेवटच्या पाच मिनिटांत तू वन-डेचा कर्णधार नसशील एवढं कळवण्यात आलं. दरम्यान गांगुली याने याआधी एकदिवसीय संघाचं कर्णधारपदाबाबत विराटसोबत चर्चा  झाली होती, असं म्हटलं होतं. पण विराटच्या प्रतिक्रियेनंतर या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 


याशिवाय विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडतानाही बीसीसीआयला कळवलं होतं. तेव्हाही बीसीसीआयने केवळ होकार देत यावर कोणतीच चर्चा केली नव्हती, असंही विराट म्हणाला. तसंच आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय सामने खेळताना विराटला विश्रांती हवी आहे, तसंच त्याच्या मुलीचा वाढदिवस यादरम्यान असल्यानं त्याला सुट्टी हवी आहे. अशा बातम्याही समोर येत होत्या. यावर बोलताना विराटने मी अशी कोणतीच विनंती केली नसून एकदिवसीय संघातून खेळण्यासाठी मी तयार असल्याचं विराट म्हणाला. त्यामुळे विराट आणि बीसीसीआयमध्ये नक्कीच काहीतरी खटकत असल्याची शक्यता अजून दृढ झाली आहे.


बीसीसीआयचं म्हणणं काय?


कर्णधारपदाच्या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने टी20 संघाचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं. ज्यानंतर मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार म्हणजे टी20 साठी रोहित आणि वन-डेसाठी विराट असल्यास संघाच्या खेळावर परिणाम होऊल त्यामुळे रोहितकडेच दोन्ही जबाबदाऱ्या दिल्याचं म्हटलं आहे.    


संबधित बातम्या



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live