मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये (Asian Games 2023) भारत (india) आणि इराणमध्ये (Iran) रंगलेला कबड्डीच्या (Kabaddi) अंतिम सामन्याला काहीसं अनपेक्षित वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणी परिस्थिती इतकी तणावपूर्वक झाली की, अंतिम सामना तासाभराहून अधिक काळ स्थगित करण्यात आला. दोन्ही बाजूंनी सातत्याने विरोध करण्यात आल्याने रेफ्री आणि सामना अधिकारी चांगलेच कोंडीत सापडले. सामन्यात 90 सेकंदांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या वादाला सुरुवात झाली. त्यावेळी दोन्ही संघाचे गुण देखील सारखेच होते. 28-28 अशी बरोबरी दोन्ही संघानी केली होती. पण भारताचा कर्णधार पवन सेहरावतने डू ऑर डायची रेड टाकली आणि नाट्यमय वादाला सुरुवात झाली. 


पण या सगळ्या नाट्यमय वादानंतर अखेर निर्णय हा भारताच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाट्याला सुवर्णपदक आले. पण पंचांनी दिलेल्या या निर्णयावर इराणच्या संघाने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खेळपट्टीवर पुन्हा एकदा तणावचं वातावरण निर्माण झालं. पण हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला नंतर वादाचं निवारणं कसं झालं हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. 


वादाला कशी सुरुवात झाली?


सामन्याचा तो खरंतर रोमहर्षक क्षण होता. शेवटचे 90 सेकंद उरले होते. भारताचा कर्णधार  पवन सेहरावतने डू ऑर डायची रेड टाकली आणि वादाची ठिणगी उडाली. पवन त्याच्या रेडमध्ये इराणच्या खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी तो लॉबीमध्ये गेला. पण त्याला डॅश करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात इराणचे काही खेळाडूही लॉबीमध्ये गेले. पण यावेळी पवनने टच पॉईंट मिळवला की तो कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करताच लॉबीमध्ये गेला यावरुन या सामन्यात वादाला सुरुवात झाली. 


पंचांचा निर्णय


सुरुवातीला पवन कोणत्याही खेळाडूला टच न करता बाहेर गेल्याने पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पण भारतीय संघाने या निर्णयाचा तीव्र निषेध केला. त्यानंतर टीव्ही पंच आणि ऑन-कोर्ट पंच यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला. त्यांनी हा निर्णय मात्र भारताच्या बाजून दिला. या निर्णयामुळे भारताला चार आणि इराणला एक गुण मिळाला. पण या निर्णयाचा इराणच्या संघाकडून तीव्र विरोध करण्यात आला. 


खरंतर हा निकाल लावताना कोणता नियम लावावा हा संभ्रम पंचांना होता. कारण आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन अर्थातच आयकेएफ आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील नियमांचा समावेश होता. यामध्ये आयकेएफच्या नियमांनुसार, जर संघातील एखादा खेळाडू हा सीमारेषेबाहेर गेला आणि त्या संघाने रेडरला पकडले असेल तर तो रेडर बाद न ठरवता त्या संघातील खेळाडूंना बाद ठरवले जाते. पण प्रो कबड्डी लीगच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने लॉबीमध्ये पाऊल टाकले तर त्या रेडरला बाद केले जाते आणि समोरच्या संघाला एक गुण दिला जातो. 


आणि संभ्रम अधिक वाढत गेला...


 टीव्ही पंच आणि ऑन-कोर्ट पंचांनी भारताच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. इराणकडून या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यामुळे रेफ्री देखील गोंधळात सापडले. कारण निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी इराणचा संघ हा  न्यायाधीशांच्या डेस्कवर पोहचला. पण वारंवार रिव्ह्यू घेऊन देखील कोणत्या नियमांनुसार निष्कर्ष लावायचा हा संभ्रम पंचांच्या मनामध्ये निर्माण झाला. त्यावेळी सर्व खेळाडू हे मॅटवरच होते. पंच हे मॅटभोवती  फेरफटका मारताना परिस्थितीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं. 


भारताच्या प्रशिक्षकांचा प्रश्न


भारताचे प्रशिक्षक ई भास्करन यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. त्यांनी यावेळी म्हटलं की, जर नवा नियम लागू होत असेल तर  रेफ्रींनी भारताच्या रिव्ह्यूनंतर निर्णय का बदलला? पण यावर विचारविनिमय करुन अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा इराणच्या बाजूने निर्णय दिला. पण तेव्हा भारताच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंना मॅटवरच बसून राहण्यास सांगितलं. भारतीय संघाने पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. त्यावेळी इतर अधिकाऱ्यांना आणि भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनचे सरचिटणीस  यांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू करुन पाहिले. त्यावेळी प्रत्येक संघाला एक एक गुण देण्यात आला. 


शेवटी काय झालं?


अखेर तिनदा निर्णय बदलून अधिकाऱ्यांनी निकाल भारताच्या बाजूने दिला. अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आणि भारताला तीन गुण दिले. या निर्णयामुळे इराणच्या संघाने मॅटवर बसूनच विरोध केला. पण शेवटी अधिकाऱ्यांनी भारताच्या बाजूने निर्णय देण्यावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यानंतर जवळपास तासाभाराच्या या नाराजीनाट्यानंतर खेळ पुन्हा सुरु करण्यात आला. आणखी एका मिनिटाच्या खेळामध्ये दोन चढाया करण्यात आल्या. अखेर भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डीमध्ये आठवे सुवर्णपदक मिळवले.


हेही वाचा : 


Asian Games 2023: कबड्डीमध्ये पुरुषांची देखील सुवर्णकामगिरी, अंतिम फेरीत गतविजेत्या इराणला पराभूत करुन भारताने रचला इतिहास