Asian Games 2023 Team India Cricket Schedule :  आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 2023 (Asian Games 2023 ) महिला संघांसोबतच पुरुष संघ देखील क्रिकेट सामने खेळणार आहेत. यासाठी भारताच्या पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. 


 आता वेळापत्रकाबद्दल मोठी बातमी आली आहे. एका अहवालानुसार, गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाला आयसीसी टी-20 मधील क्रमवारीच्या आधारे थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा उपांत्यपूर्व सामना 5 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तर महिला संघांचे सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. 


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर 6 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळतील. त्यानंतर 7 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल. हा सामना सुवर्णपदकासाठी असेल. 


आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडत असताना दुसरीकडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे भारतासह अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे दुय्यम संघच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत भारतासाठी विजय अधिक सोपा होऊ शकतो. मात्र, टीम इंडियाच्या वेळापत्रकाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये 14 संघ खेळणार आहेत. तर पुरुष क्रिकेटमध्ये 18 संघ सहभागी होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून महिला क्रिकेटला सुरुवात होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी सुवर्ण आणि कांस्य पदकांसाठी सामना रंगणार आहे. 28 सप्टेंबरपासून पुरुष क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याचा अंतिम सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे. जर  भारतीय वेळेनुसार क्रिकेट सामने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहेत. 


यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. 40 विविध क्रीडा प्रकारांसाठी स्पर्धा होणार आहे. 


19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)


हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलेय. 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेता ठरला होता.


महिला क्रिकेट संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सर्वाणी, तितास साधू, राजेश्वरी गायकवा, मिन्नू मानी, कनिका आहूजा , उमा छेत्री, अनुषा बरेड्डी


राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, साइका इशाक आणि पूजा वस्त्राकर