Kohli's T20I Record: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फंलदाज विराट कोहलीकडं (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील षटकारांचं शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. हा विक्रमी टप्पा गाठण्यापासून तो फक्त तीन षटकार दूर आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेव भारतीय फलंदाज आहे.


ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्डला टाकण्याची संधी
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं आतापर्यंत 101 आंतरष्ट्रीय टी-20 सामन्याच्या 93 डावात 97 षटकार ठोकली आहेत. तर, शर्मानं 126 सामन्यांमध्ये सर्वाधिक 165 षटकार मारले आहेत. पाकिस्तानविरुद्ध तीन षटकार मारताच विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा 10वा फलंदाज ठरेल. यासह विराट कोहली ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) आणि किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज) यांनाही मागं टाकेल, ज्यांनी प्रत्येकी 99 षटकार ठोकले आहेत.


आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 172 षटकारांची नोंद आहे. तर, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मार्टिन गप्टिलला मागं टाकण्यासाठी रोहित शर्माला फक्त आठ षटकारांची गरज आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्यासह एविन लुईस (वेस्ट इंडीज), इऑन मॉर्गन (इंग्लंड), कॉलिन मुनरो (न्यूझीलंड), डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) आणि पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) या क्लबमधील इतर स्टार फलंदाज आहेत.


विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहलीनं आतापर्यंत दोन सामन्यात चार षटकार मारले आहेत.पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराट कोहलीनं 34 चेंडूंत 35 धावा केल्या होत्या. ज्यात एका षटकाराचा समावेश होता. तर, हाँगकाँगविरुद्ध सामन्यात तीन षटकारांच्या मदतीनं त्यानं 44 चेंडूत 59 धावा केल्या होत्या. आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. 
 
हे देखील वाचा-