Asia Cup 2022 Match Schedule : युएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी आता अखेरचा पात्र संघही समोर आला आहे. आधी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असताना आता हाँगकाँगने पात्रता फेरीतील सर्व सामने जिंकत स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे आता एकूण 6 संघ आशिया कपसाठी आमने-सामने असतील. हाँगकाँगचा संघ भारत आणि पाकिस्तानसोबत 'ग्रुप ए' मध्ये असणार आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगने आशिया कपचे यजमान यूएई संघाला 8 विकेट्सनी मात दिली. या विजयासोबत हाँगकाँगने आशिया कपमध्ये जागा पक्की केली असून आता ते ग्रुप स्टेजसाठीचे सामने खेळतील. चौथ्या वेळा असं होणार आहे की हाँगकाँगचा संघ आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. याआधी हाँगकाँगने 2004, 2008 आणि 2018 मध्ये आशिया कप स्पर्धे खेळली होती. त्यानंतर आता चौथ्या वेळेस हाँगकाँगचा संघ स्पर्धेत असेल.
अशी मिळवली पात्रता
पात्रता फेरीत अत्यंत अप्रतिम कामगिरी करत हाँगकाँगच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. हाँगकाँगने सिंगापुरसह कुवेत आणि यूएई संघाला ही मात दिली. त्यामुळे पात्रता फेरीच्या गुणतालिकेत हाँगकाँगने अव्वल स्थान कायम ठेवत पात्रता मिळवली. कुवेतचा संघ चार गुणांसह दुसऱ्या तर यूएईचा संघ एक सामना जिंकून तिसऱ्या स्थानावर असून सिंगापुरचा संघ एकही सामना न जिंकल्यामुळे चौथ्या स्थानी राहिला.
कसं आहे वेळापत्रक?
आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...
ग्रुप स्टेजचे सामने
27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
हे देखील वाचा-