Jammu Kashmir : आशिया कप (Asia Cup) 2022 मध्ये पाकिस्तानचा (Pakistan) संघ फायनलमध्ये पोहोचला असून यावेळी त्यांनी 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानला (Afghanistan) मात देत महत्त्वाच विजय मिळवला. रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने 1 गडी राखून विजय मिळवला होता. पण याच सामन्यावेळी भारतातील जम्मू येथील एम एम कॉलेजमध्ये (MM College) काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लगावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबधित विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली जात असून त्यांना सस्पेंड करण्याचीही मागणी होत आहे. 


यावेळी दोन गटांमध्ये बाचा-बाची झाल्याची माहितीही समोर आली होती. बुधवारी (7 सप्टेंबर) आशिया कपमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानला एक गडी राखून अतिशय चित्तथरारक अशी मात दिली. याचवेळी भारतातील जम्मू येथील एमएएम कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले ज्यामुळे त्याठिकाणी वादही सुरु झाला. त्यानंतर संबधित विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी करत काही विद्यार्थी रस्त्यावर देखील उतरले होते. यावेळी घोषणाबाजी होत असलेले फोटो हे जम्मूच्या एमएएम कॉलेजमधील आहेत.  


रोमहर्षक सामन्यात पाकिस्तान विजयी



अफगाणिस्ताननं दिलेलं 130 धावांचं आव्हान पाकिस्ताननं अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केलं. वेगवान गोलंदाज नसीम शाहनं दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने फायनलच तिकिट पक्कं केले आहे. पाकिस्ताननं नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. इब्राहिम झद्रान याच्या 35 धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तान संघानं निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 129 धावांपर्यंत मजल मारली होती. हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून हॅरिस रऊफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.


अफगाणिस्ताननं दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फखर जमानही तंबूत परतला. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावेली पुन्हा एकदा रिझवानने संयमी फलंदाजी केली. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव ढासळतोय असे वाटत होते. पण शदाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी सामना फिरवला. शदाब खानने 30 तर अहमदने 36 धावांची खेळी केली. याच वेळी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. अखेरच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 12 धावांची गरज होती. आणि हातात फक्त एक विकेट... त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला.



हे देखील वाचा-