India T20I Squad for England Series 2025 : भारत आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर केला होता, तर आता भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे, तर ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळलेल्या बहुतेक खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संधी मिळाली आहे. त्याच वेळी, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा मराठमोळ्या कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांना संधी का मिळाली नाही? यावर चाहते मोठ्या संख्येने आक्षेप घेत आहेत.
कामगिरीत सातत्य नसल्याने अभिषेक शर्माला संघातून वगळले जाऊ शकते अशी अटकळ होती, परंतु इंग्लंडविरुद्ध त्याला आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की 15 सदस्यीय संघात एकाही सीएसके खेळाडूचा समावेश नाही. यामुळेच चाहते सोशल मीडियावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनावर आपला राग व्यक्त करत आहेत.
एका चाहत्याने म्हटले की, गौतम गंभीरचे एमएस धोनीशी वैयक्तिक वैर आहे हे सर्वांना माहिती आहे. या कारणास्तव ऋतुराज गायकवाडला आणि शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर काही इतर चाहत्यांनी म्हटले की, हा अन्याय फक्त सीएसके चाहत्यांवरच का केला जातो. एका चाहत्याने तर मर्यादा ओलांडली आणि म्हटले की, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंविरुद्ध भारतीय संघात वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू आहे.
गायकवाडने आतापर्यंत खेळले 23 टी-20 सामने
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारे ऋतुराज गायकवाड यांनी आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 23 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 20 डावांमध्ये फलंदाजी करताना 39.56 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकी खेळी आहेत. जर आपण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात गायकवाडचा स्ट्राईक रेट पाहिला तर तो 143.54 आहे जो सलामीवीर फलंदाज म्हणून खूप चांगला मानला जाऊ शकतो. आता गायकवाडला संघात परतण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागेल.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
हे ही वाचा -