पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
देशभरात आज फादर्स डे साजरा केला जात आहे, आपल्या वडिलांच्या आठवणी जागवत वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियातूनही वडिलांचे फोटो शेअर होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनीही आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, वडिलांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.
माझे बाबा आणि आई, यांनी अतोनात कष्ट करून आम्हा भावंडांना वाढवलं, माझं शिक्षण केलं. माझ्या बाबांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आमच्यासाठी हे सर्व करत असताना स्वाभिमानाशी मात्र कधीच तडजोड केली नाही, हेच संस्कार त्यांनी आमच्यावरही केले.
आज त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीच्या जोरावरच माझी वाटचाल खंबीरपणे सुरु आहे. पोटाला चिमटा काढून त्यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी हरप्रकारे साथ दिली, अशा भावना राम सातपुते यांनी व्यक्त केल्या आहेत.
विद्यार्थी परिषद, संघाचं काम यांसाठी देखील वडिलांनी मोलाचा पाठिंबा दिला. जेव्हा मी आमदार झालो, तेव्हा आमदार म्हणजे नेमकं काय असतं हे देखील त्यांना ठाऊक नव्हतं. पण आपला मुलगा काहीतरी चांगलं काम करणार, एवढं मात्र त्यांना माहित होतं.
वडिलांचा हा विश्वास सार्थ ठरवू शकलो, त्यांच्या कष्टांचं चीज माझ्या कामातून करू शकलो, याचं मनापासून समाधान वाटतंय. आज एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांचे संस्कार माझ्यासाठी नक्कीच मोलाचे ठरत आहेत, असेही राम यांनी म्हटले आहे.
बाबा, तुम्ही माझा खरा कणा आहात! तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. आज पितृदिनानिमित्त फक्त तुमच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी वाटली, असे म्हणत राम सातपुते यांनी वडिलांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, राम सातपुते विद्यमान आमदार आहेत, नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रणिती शिंदे यांनी पराभव केला.