Gadchiroli : गडचिरोलीच्या आंबेझरीत रानटी हत्तींचा कळप आला, 14 घरे पाडून गेला
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी येथे रानटी हत्तींनी 14 घरे जमीनदोस्त केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 ते 20 हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली.
या घटनेने या घरातील कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत.
आंधळी (सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कुटुंब असलेले आंबेझरी हे गाव डोंगर व घनदाट जंगलाने वेढलेले आहे.
या आदिवासीबहुल गावात 2 ऑगस्ट रोजी पहाटे 18 ते 20 च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने हल्ला चढवला. घरांची नासधूस करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी मुलाबाळांसह घरातून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर स्वत:ला सावरत गावकऱ्यांनी टेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद न देता धुडगूस सुरुच ठेवला. माहिती मिळताच पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली व पंचनामा केला.
या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे नुकसान झाले. त्यामुळे येथील गरीब कुटुंबांना बेघर होण्याची वेळ ओढावली.
अतिदुर्गम गाव असल्याने येथे चार ते सहा महिन्यांचे धान्य साठा करून ठेवतात. मात्र, ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छत तर गेलेच पण वर्षभराच्या धान्याचीही नासाडी झाल्याने गावकरी संकटात सापडले आहेत.
शासनाने अन्नधान्याची सोय करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.