यवतमाळ :  वणी तालुक्यातील केसुर्ली गावात लगत असलेल्या जंगलात कोंबड बाजार भरवला जात असल्याची माहिती मिळाली.  मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सायंकाळी त्याठिकाणी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या सहा आरोपींना अटक केली. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी 7 लाख 26 हजार 950 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु ज्यावर पैशाची बाजी लावली जाते तो झुंजीचा कोंबडा मात्र एकच पोलिसांच्या हाती लागला, तो ही मृत अवस्थेत मिळाला आहे. कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर कोंबड्याची झुंज लावणारे तर हाती लागतात, पण कोंबडेच पळून जात असल्याचे चित्र कोंबड बाजारावरील धाडीत पहायला मिळते. 


केसुर्ली गावालगत असलेल्या जंगलात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केसुर्ली जंगलात कुणालाही सुगावा न लागू देता अतिशय शिताफीने त्याठिकाणी सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. परंतु तरीही काही जुगाऱ्यांना पोलिसांची चाहूल लागली व ते जंगलात सैरावैरा पळत सुटले.


पोलिसांनी कोंबडे भांडवणाऱ्या सहा जणांना घटना स्थळावर घेराव घालून अटक केली. पोलिसांना पाहून पळालेल्यांच्या दुचाक्या मात्र घटनास्थळीच उभ्या होत्या. पोलिसांनी घटना स्थळावरून तब्बल 21 दुचाक्या जप्त केल्या. तर कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या आरोपींजवळून रोख 11 हजार 350 रुपये जप्त करण्यात आले. त्याच्याप्रमाणे एक मरणासन्न अवस्थेत असलेला कोंबडा, दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण 7 लाख 26 हजार 950 रुपयांचा मोठा मुद्देमाल पोलिसांनी या धाडीत जप्त केला.  ही कार्यवाही अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, यांनी केली.


संबंधित बातम्या :