Aurangabad Crime News: औरंगाबादच्या गुन्हे शाखेच्या पथकाने चित्तथरारकपणे पाठलाग करुन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहे. पुढे चोरट्यांची गाडी आणि मागे पोलिसांची गाडी होती. पण पोलिसांचा संशय येताच चोरट्यांनी गाडी प्रचंड वेगात पळवली, मात्र पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता पाठलाग करून अखेर चोरट्यांना बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे. त्यांनतर चोरीची एक कार आणि सोने-चांदीचे दागिणे इत्यादी एकुण 15 लाख 78 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीचे आरोपी हे लाल रंगाच्या टाटा कंपनीच्या टीयागो कारने जालना रोडवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जालना रोडवरील कॅम्ब्रिज चौक येथे सापळा लावला होता. दरम्यान सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास संशयीत लाल रंगाची टियागो गाडी झाल्ट्याकडुन येणाऱ्या पुलावर पोलिसांना दिसली. विशेष म्हणजे कार चिकलठाण्याकडे न वळता पुढे नारेगाव रोडवर गेल्याने पथकाने तिचा पाठलाग सुरु केला.
गाडीवरील नियंत्रण सुटले आणि...
पाठीमागून येणारी गाडी जास्त वेगाने येत असल्याने पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. त्यांनी आणखी वेग वाढवला परंतु, कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडलगत उतार असलेल्या सहान जागेवर जाऊन फसली. त्यामुळे गाडी त्याच अवस्थेत सोडून त्यांनी पळायला सुरवात केली. पुन्हा चोर पुढे आणि मागे पोलीस अशी चित्र पाहायला मिळाले. मात्र काही अंतरावर जाताच पोलिसांनी त्यांना घेरत पकडले. त्यांनतर त्यांचे नाव गाव विचारले असता दोघेही विधी संघर्ष बालक असल्याचे समोर आले.
चोरीची कार जप्त...
पोलिसांनी दोन्ही विधी संघर्ष बालकांची चौकशी केली असता त्यांनी, शहरातून टियागो कंपनीची लाल रंगाची कार चोरल्याची कबुली दिली. तसेच घराची कडी-कोंडा तोडुन चोरी केलेले सोने-चांदीचे दागिणे इत्यादी एकुण 15 लाख 78 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही विधी संघर्ष बालके असल्याने त्यांच्या आई-वडीलांना पोलीस ठाणे पुंडलिकनगर येथे बोलावून, पुढील कारवाई करण्यात आली.