Sangli Crime: सांगली पोलिस मुख्यालयाच्या हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने पोलीस मुख्यालय परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंदनाच्या या झाडाच्या चोरीची  विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.
 
सांगली पोलिस मुख्यालयाच्या हद्दीतून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचे पुढे आले आहे. चार वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारी असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यावेळी झाडे चोरीला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. हा प्रकार राज्यभर गाजला होता. यावेळी मात्र चोरटे तेथीलच ट्रॅफिक पार्कमधील दोन झाडांचे बुंधे घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत. झाडे चोरीला गेल्याची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली आहे. 


पोलिस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी


चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान पोलिस मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची चोरी केली. याप्रकरणी पोलिस शिपाई दिपक तुकाराम वडेर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद  दिली आहे. चोरट्यांनी संबंधित झाडे करवतीने कापली आहेत. त्यानंतर फांद्याकडचा भागही कापून तेथेच टाकला आहे. केवळ दोन बुंधे घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे दोन बुंधे चोरीला गेल्याची नोंद केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील हे करत आहेत. गेल्या काही दिवसात घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी याबरोबरच धुमस्टाईलने हिसडा मारुन पळविणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहेत. यात भर म्हणून चोरट्यांनी आता थेट पोलिस मुख्यालयाच्या परिसरात घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. हे एक प्रकारचे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्यासारखेच झाल्याची चर्चा आहे.


24 तास पोलिसांचा वावर असलेल्या पोलिस मुख्यालय परिसरात घुसून चोरी 


 चोरट्यांनी आता थेट पोलिस मुख्यालयाच्या परिसरात पोलिस घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. हे एक प्रकारचे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्यासारखेच झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी चंदन चोरट्यांनी चक्क पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या कुंपनानजिकचीच चंदनाची झाडे कापली होती.  आता पुन्हा चोरटे चोवीस तास पोलिसांचा वावर असलेल्या पोलिस मुख्यालय परिसरात घुसून चोरी करत आहेत.