वाशिम: उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे वादामध्ये सुरुवातीपासूनच शिंदे गटाकडे कल असलेल्या खासदार भावना गवळी यांनी अखेर शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. तशी त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही. पण त्यांच्या गटातील काही नगरसेवक आणि कार्यकर्ते आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे वाशिममध्ये आता शिवसेनेला मोठी खिंडार पडल्याचं चित्र आहे.


भाजपसोबत गेलं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने लोकसभेतील प्रतोदपदावरुन हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी आता खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र शिवसेने नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं आहे.


खासदार भावना गवळी शिंदे गटात का सामिल होऊ शकतात?


1) भावना गवळी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी.


2) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सगळे आमदार आणि काही झेडपी, पंचायत समिती सदस्य भावना गवळींच्या विरोधात गेले. 


3) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये होणारा पराभव, कमी उमेदवार  निवडून येणे हे टाळण्यासाठी युती महत्वाची वाटणे.


4) शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्यासोबत असलेला वाद, त्यामुळे मतदार संघातील मतदार दुरावण्याची शक्यता.


5) बंजारा नेत्यासोबत वाद असल्याने बंजारा समाजाचे मोठ्या प्रमाणात असलेलं मतदान भावना गवळींच्या विरोधात मतदान करू शकते.


6) वाशिम शिवसेनामध्ये पडलेल्या गटबाजीमुळे, मोठे राजकीय मित्र नसल्याने येत्या निवडणुका कठीण होणार.


7) वाशिम नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासोबत वाद, येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भावना गवळी यांचं राजकीय वजन संपुष्टात येऊ शकते.


8) इतर राजकीय पक्षांसोबत राजकीय संबंध दुरावले ते शिंदे गटात गेल्याने, भाजप शिंदेगटात सोबत राहिल्याने सबंध सुधारण्यासाठी मदत मिळू शकते.


9) शिंदे गटासोबत न गेल्यास भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते. येत्या काळात शिंदे गटातून किंवा भाजपमधून नवीन उमेदवारांना संधी मिळू शकते.


10) शिंदे गटासोबत गेल्यास गेल्या पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांना केंद्रात मंत्रिपदाच्या संधीची शक्यता.