Yavatmal News : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडून अघोरी उपाय करण्याचे प्रकार घडत आहेत. पोटदुखीमुळे (Stomach Ache) नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे (Marking Nut) चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये (Yavatmal) उघडकीस आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचं कळतं.
ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरुन बाळाला चटके
घाटंजी तालुक्यातील पारा पीएचसीमध्ये 6 जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखं रडत होतं. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या (Newborn Baby) पोटावर बिब्बा गरम करुन त्याचे चटके दिले. मात्र या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली नाहीच उलट आणखीच चिंताजनक बनली आहे.
बाळाला जगवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
यानंतर बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे बाळावर उपचार केले जात आहे. बाळाला जगवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु मन हेलावणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही असे अघोरी प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. वारंवार आवाहन आणि जनजागृती करुनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता अधिक वाढली आहे.
मेळघाटात आई-वडिलांकडूनच बाळाच्या पोटावर गरम विळ्याचे 100 चटके
अमरावतीमध्ये तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराची घटना घडली होती. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला होता. बाळाला आठ दिवसांपासून ताप, खोकला होता आणि त्याचे पोट फुगत होते. पण या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले होते.
हेही वाचा