अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले आहेत. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.


श्याम सज्जु तोटा असं या आठ महिन्यांच्या बाळाचं नाव आहे. आठ दिवसांपासून या बाळाला ताप, खोकला होता आणि त्याचे पोट फुगत होते. अशा पोट फुगीला आदिवासी 'फोपसा' म्हणतात. पण या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील 16 जून रोजी त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले.


हा प्रकार समोर आल्यानंतर काटकुंभ इथलं भरारी पथक तसंच वैद्यकीय अधिकारी इथे पोहोचले. त्यांना बाळाला उपचारांसाठी चुरनी इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणलं. सध्या त्या बालकावर उपचार सुरु आहेत. चिखलदरा पोलिसांनी मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


परंतु या घटनेनंतर मेळघाटात आजही अंधश्रद्धा कायम आहे आणि त्यामधूनच हा गंभीर प्रकार घडला आहे.


Melghat Superstition | मेळघाटात आई-वडिलांकडून आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके