Yavatmal Crime news यवतमाळ : वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हवेत गोळीबार (Shooting) करून स्वत:ची हवा करणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले. यवतमाळ पोलिसांनी बर्थ डे बॉयला वाढदिनीच अटक केली. यवतमाळच्या वणी परिसरातील राजूर भांदेवाडा मार्गावर असलेल्या एका शेतात, बर्थ डे सेलिब्रेशनवेळी हा प्रकार घडला. यावेळी हवेत गोळीबार करुन हवा करण्याचा प्रयत्न झाला. उमेश किशोरचंद राय असे या बर्थडे बॉयचे नाव आहे. त्याची पोलीस रेकॉर्डवर गुन्हेगार म्हणून नोंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून आरोपीसह विदेशी बनावटिचे पिस्तूल जप्त केले आहे.  


हवेत गोळीबार करून हवा करणे महागात 


हल्ली आपला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे फॅड सुरू आहे. या फॅडच्या नादात अनेक अतिउत्साही लोकांकडून नको ते प्रकार घडत असतात. त्यात अगदी धारधार शस्त्राने केक कापणे, त्याचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून स्वत:ची हवा करणाऱ्यांवर अनेक वेळा  पोलिसांनी कारवाई केल्याच्या घटना आपण बघितल्या आहेत. अशा घटनांकडे पोलीस देखील कटाक्षाने लक्ष देऊन असतात. असाच एक प्रकार यवतमाळच्या वणी परिसरातील राजूर भांदेवाडा मार्गावरील मनोज कश्यप यांच्या शेतात घडला.


या प्रकरणातील सराईत गुन्हेगार असलेला 34 वर्षीय उमेश किशोरचंद राय हा महादेव नगरी, चिखलगाव येथील रहिवासी आहे. आरोपी उमेश हा आपल्या साथीदारांच्या सोबतीने मनोज कश्यप यांच्या शेतात वाढदिवस साजरा करत होते. रात्रीच्या सुमारास मोठ्याने डीजे, दारूच्या नादात पार्टी रंगात येत होती. ही पार्टी रंगात येत असताना आरोपी उमेश रायने आपल्या जवळील पिस्तूल बाहेर काढले. त्याक्षणी उपस्थित साथीदारांना या गोष्टीचे फार अप्रूप वाटले आणि त्यातील कहर म्हणजे आरोपी उमेशने उत्साहाच्या नादात 7.65mm पिस्तूलमधून दोन राऊंड हवेत झाडले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी मोठ्या शिताफीने या पार्टीवर छापा टाकण्यासाठी सापळा रचला.


दोन राऊंड हवेत झाडले


रात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी मनोज कश्यप यांच्या शेतात सुरू असलेल्या पार्टीस्थळी धाड टाकली. पोलीस आपल्याकडे येत असल्याची भनक या पार्टीतील उपस्थितांना लागली आणि एकच धावपळ सुरू झाली. घटनास्थळी मुख्य आरोपी असलेल्या उमेश रायचा पाठलाग पोलिसांनी केला आणि त्याला अटक करण्यात आली. या अचानक टाकलेल्या धाडीतून पोलिसांना उमेश कडून विदेशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि दोन खाली केस मिळाले. पोलिसांनी ही रिव्हॉल्वर दोन्ही केस आणि आरोपीचा मोबाईलसह उमेशला अटक केली. या प्रकरणात आपण दोन राऊंड हवेत गोळीबार केल्याचे देखील उमेशने मान्य केले असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. 


गुन्हेगारी पार्श्वभूमी


उमेश राय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून,अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपी उमेश हा एका वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय झाला होता. दरम्यान आरोपी उमेशकडे विदेशी बनावटीची रिव्हाल्वर असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना होती. याच मागावर असलेल्या पोलिसांना अखेर या कारवाईत यश आले असून पोलीस या गुन्हातील पुढील तपास करीत आहे.