मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज वर्धा, यवतमाळ वाशिम आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीत नेमकं काय झाले? याबाबत सुत्रांनी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात...
वर्धा लोकसभा मतदार संघाचा आढावा..
वर्धा लोकसभा मतदार संघांचा आढावा घेत असताना विधानसभा मतदार संघांची देखील माहिती घेतली. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, याची स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. आपल्याला आघाडीमध्ये निवडणूका लढवायच्या आहेत त्यादृष्टीने आपली तयारी करा, जर विधानसभा किंवा लोकसभा मतदार संघात आपण जागा मागताना आपली तयारी असायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.
जर लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घ्यायचा असेल तर त्याठिकाणी आपल्या पक्षाची ताकद कशी आहे, आपला उमेदवार दिला तर निवडुन येऊ शकतो का? याविषयी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविकास आघडीमध्ये आपण मतदार संघावर दावा करत असताना त्या मतदार संघात आपली ताकद वाढवा, स्थानिक पातळीवरील संघटना मजबूत करा उद्धव ठाकरेंनी पदाधिकार्यांना आदेश दिलेत.
भावना गवळी आणि विधानसभेत संजय राठोड यांना धडा शिकवा -
आगामी लोकसभा निवडणुकीत भावना गवळी आणि विधानसभेत संजय राठोड यांना राजकीय धडा शिकवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आगामी यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आज झाली. वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघात आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करा, कुठल्याही परिस्थितीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. येणाऱ्या निवडणुकात भावना गवळी आणि संजय राठोड यांना धूळ चाखायला लावा, असेही सांगितले.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा
उद्धव ठाकरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. आपल्याला सोडून गेलेल्या खासदाराचा कुठल्याही परिस्थितीत पराभव करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीतील पदाधिकाऱ्यांना दिल्या. रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा हा आपला पक्ष लढवणार असून या लोकसभा मतदारसंघात आपला खासदार जरी पक्ष सोडून गेला, असला तरी सध्याची परिस्थिती पाहून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.