Yavatmal Unseasonal rain : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) सलग तिसऱ्या दिवशी देखील यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश भागत हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) आधीच राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं असतांना त्यात आता अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवाला असल्याची प्रतिक्रिया शेतकाऱ्यांमधून उमटतान दिसते आहे.    


अवकाळीने हिरावला तोंडचा घास


शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्या संकटांचं शुक्लकाष्ट काही संपायचं नाव घेईना. कधी दुष्काळाच्या संकटांचा डोंगर उभा राहतो, तर कधी वाटेत अवकाळीचा समुद्र आडवा येतो. शेता-वावरात कष्ट करत, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांतून आता अश्रू ओघळू लागले आहेत.खरिपातील अतिवृष्टीतुन सावरत, रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी उभा राहू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर परत एकदा मोठे संकट ओढवले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागत आज सलग तिसऱ्यांदा अवकाली पावसाने अवकृपा केली आहे. जिल्ह्यातील पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यातील जवळ जवळ 10 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.  या अवकाळी पासामुळे वेचणीला आलेला कापूस पावसात ओलाचिंब झाला आहे. तर जिल्ह्यातील इतरही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात अवकाळी पाऊस बरसला आहे. यात तूर, कपाशी, केळी, हळद, पालेभाज्या याचे अंदाजे 3 लाख हेक्टर वर नुकसानीचा अंदाज आहे. शेतात वेचणीला आलेल्या कापूस पूर्णपणे ओला झाल्याने कापसाची प्रत घसरून कमी दर शेतकऱ्यांच्या हातात पडतील अशी भीती शेतकऱ्यांना  भेडसावत आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसुल विभागाला दिले आहे. तर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सर्व मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 


शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ 


यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्र घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पेरणी केलेल्या क्षेत्राला बसला आहे. शेतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.


विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता


राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तास राज्यात पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज आहे.  हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्याने परिणामी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 


हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली 


वर्ध्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेय. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले असून धावडी येथील शेतकऱ्याच्या 7 एकरमध्ये लागवड केलेल्या कपाशीवर आतापर्यंत 4 लाखाचा खर्च झालेला आहे. पहिल्याच वेचणीला मजूर मिळाला नाहीय. त्यामुळ वेचणी करता आली नसल्याने अचानक आलेल्या पावसात जवळपास 40 ते 50 क्विंटल कपाशी पावसात भिजली असून सर्व पीक मातीमोल झाले आहे.