Yavatmal News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. शिवसेनेकडून आज यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन (Chakka jam agitation) करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला (Cotton Price) प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करावा. तसेच कापसाची त्वरित खरेदी चालू करावी. सोयाबीनला प्रति क्विंटल 7 हजार रुपयांचा रुपये हमी भाव जाहीर करावा, प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 


Yavatmal Shivsena : मागण्या शासनाने पूर्ण न केल्यानं शेतकरी आक्रमक 


दरम्यान, शेतकरी प्रश्नावरुन शिवसेनेच्या वतीन एक महिन्यापूर्वी म्हणजे 9 जानेवारीला महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं होतं. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या मागण्या शासनाने पूर्ण न केल्याने जिल्ह्यात एक महिन्यानंतर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्याने शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत.


काय आहेत प्रमुख मागण्या?



  • कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करावा

  • कापसाची त्वरित खरेदी चालू करावी

  • सोयाबीनला प्रति क्विंटल 7 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करावा

  • हरभरा आणि तुरीची नाफेडमार्फत ऑनलाईन नोंदणी सुरु करावी

  • हरभरा आणि तुरीची त्वरित खरेदी सुरु करावी


Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात होणार चक्का चाम आंदोलन 


विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हाभरात आज चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत. त्यामुळं शिवसेना आक्रमक झाली आहे. आज होणारे चक्का जाम आंदोलन हे यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात होणार आहे. आजच शिवसेनेचं आंदोलन हे उग्र स्वरुपाचं होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


जिल्ह्यात वर्चस्व कायम ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न 


यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री संजय राठोड, वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी, महागाव हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात गेल्यामुळं यवतमाळमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व कमी झाले होते. पण आता माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर यासह जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनी हे आंदोलन आक्रमक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या:


औरंगाबादच्या शेतकऱ्यांची महावितरणाने वाढवली चिंता; अनेक भागांत विजेचा लपंडाव, शेतकरी संतप्त