Nagpur Crime News : नागपुरात फार्मसीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली यवतमाळच्या डॉक्टरची 1.18 कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी (Nagpur Police) विकास श्यामसुंदर बोरा (वय 45, बालपांडे लेआउट, नरेंद्र नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरातील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.


प्रकरण असे...


यवतमाळचे रहिवासी डॉ. संजू लखनलाल जोशी (वय 58) हे बालरोगतज्ज्ञ आहेत. सुजित गुलालकरी यांच्याशी त्यांची मैत्री आहे. सुजित यांनी डॉ. जोशी यांची आरोपी विकास बोराशी ओळख करून दिली. बोरा हा फार्मसी व्यवसायाशी संबंधित असून त्याने काही हॉस्पिटलमध्ये स्वत:ची फार्मसी असल्याची बतावणी केली. त्याने डॉ. प्रवीण गंटावार आणि शरद लुटे यांनी धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरसोबत रिफंडेबल करार झाला असून दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करा. त्यातून फायदा होईल, असे जोशी यांना सांगितले.


गुंतवणुकीच्या मोबदल्यात   दरमहा तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन


गुंतवणुकीच्या मोबदल्यात त्यांनी डॉ. जोशी यांना दरमहा तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. बोराच्या शब्दावर डॉ. जोशी यांनी विश्वास ठेवला. विकास बोरा डॉ. जोशी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने त्यांची डॉ. गंटावार आणि लुटे यांच्याशी ओळख करून दिली. आम्हाला फार्मसी चालवण्याचा अनुभव नाही, त्यामुळेच आम्ही बोरा याच्याशी करार केला आहे, असे डॉ. जोशी यांना सांगितले. 


विश्वास बसला अन् फसले...


डॉ. जोशी यांना त्यामुळे विश्वास पटला आणि त्यांनी आरटीजीएसद्वारे दीड कोटी बोराला हस्तांतरित केले. यानंतर डॉ. जोशी फार्मसी सुरू होण्याची वाट पाहू लागले. डॉ. जोशी यांच्या मुलाने बोराची भेट घेतली. तेव्हा त्याने पैसे कमी पडत असल्याचे कारण देत मुलाकडून 7.35 लाख रुपये घेतले. यानंतर डॉ. जोशी व त्यांच्या मुलाने संपर्क साधला असता बोराने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दबाव आणून मुलाने 38.80 लाख रुपये परत घेतले. मात्र उर्वरित 1.18 कोटी रुपये परत दिले नाहीत. अखेर डॉ. जोशी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी बोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणात डॉ. गंटावार व शरद लुटे यांच्या भूमिकेची देखील चौकशी करत आहेत.


ही बातमी देखील वाचा...


Teachers Constituency Election : गाणार यांची हॅट्रीक की परिवर्तन होणार? शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा आज निकाल