Aurangabad News: कधी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी सतत संकटात सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सध्या अशाच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) महावितरणाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. सध्या रब्बीचा हंगामाच्या लागवडी झाल्या असून, पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र अशातच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने, पिकांना पुरेसं पाणी देता येत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयात गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
आधीच खरिपाच्या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे किमान रब्बीच्या हंगामात तरी त्याची भरपाई भरून निघेल यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. मात्र असे असलं तरीही शेतकऱ्यांच्या पाठीमागचं संकट काही सुटता सुटत नाही. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे पिकांना पुरेसं पाणी मिळत नसून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन, विजेचा पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी शेतकरी करतात.
शेतकरी संतप्त
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपाची वीज सुरळीत सुरू नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अनेकदा मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत सुरू होत नसल्याने, शेतकऱ्यांनी वरखेड येथील महावितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत जाब विचारला. यावेळी शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयाच्यासमोर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.
महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!
दरम्यान, वाळूज महानगर परिसरातील जोगेश्वरी कमळापूर भागांत कृषिपंपाचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी वाळूजला महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. भरपूर पाणी उपलब्ध असूनही केवळ वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळत चालली असून उत्पादनात घट येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या वाळूज उपकेंद्रात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. अशीच काही परिस्थिती जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
जी 20 परिषदेचं शिष्टमंडळ देणार औरंगाबादच्या विद्यापीठ लेणी, मकबरा, सोनेरी महालाला भेट