यवतमाळ: महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) महत्त्वाचा पक्ष असलेला काँग्रेस (Congress) पक्षाची येत्या 11 जानेवारीला मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहे. यावेळी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या (Lok Sabha Election) जागा वाटपवर चर्चा होणार होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्या, अशी मागणी काँग्रेसची महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) करणार आहेत. शिवाय यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपण स्वतः इच्छुक असल्याचे देखील संध्या सव्वालाखे म्हणाल्या.
सर्वाधिक उमेदवारी महिलांना द्या
राहुल गांधी यांनी कायम देशातील युवावर्ग आणि महिलांनी देशाचे नेतृत्व करावे, यासाठी प्रोत्साहन दिले आहे. युवा आणि महिला देशाच्या राजकारणात सक्रिय असायला पाहिजे. ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील युवा आणि महिलांना उमेदवारी देण्याची राहुल गांधी यांचा मानस असणार आहे. आपण जर उत्तरप्रदेश मधील झालेल्या निवडणुकांनाकडे बघितले तर त्यामध्ये 40% उमेदवारी ही युवावर्गाला देण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझी देखील आग्रही मागणी हीच असणार आहे की, आगामी महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक उमेदवारी महिलांना देण्यात यावी. या मागणी करता स्वतः मी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे म्हणाल्या.
उमेदवारी दिल्यास नक्कीच लढणार
यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघात कायम महिलांचे प्रभुत्व राहिले आहे. शिवाय मतदारसंघातील सर्वसामान्यांचे कायम महिला उमेदवारांवरच विशेष प्रेम राहिले आहे. म्हणूनच गेल्या चार टर्मपासून येथे महिला प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी अशी आमची आग्रही मागणी असणार आहे. पक्षश्रेष्ठीनी मला आदेश दिल्यावर निश्चित मी या मतदारसंघाचे नेतृत्व करेल. असे देखील संध्या सव्वालाखे म्हणाल्या.
शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यातील 23 जागांवर दावा
शिवसेना ठाकरे गट वारंवार राज्यातील लोकसभेच्या 23 जागांवर दावा जरी करत असला, तरी या दाव्यांवर काँग्रेसचे अनेक नेते आक्षेप घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस आग्रही असलेल्या जागांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना तिढा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय कधी होतो, यावर इच्छुक उमेदवार आणि इंडिया आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं विशेष लक्ष असणार आहे.
दरम्यान, राज्यातील इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या निर्णयावर जेव्हा शिक्कामोर्तब होईल, तेव्हा कदाचित जागांवर होणारे दावे प्रतिदावे बंद होतील. पण जरी बंद झाले, तरी उमेदवारांची नाराजी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष नेत्यांना दूर करून एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. त्याची तयारी सर्व उमेदवारांना ठेवावी लागेल, असंच सध्या निर्माण झालेल्या चित्रातून दिसत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :