Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातही लोकसभेच्या जागावाटपावरुन पक्षांमध्ये चढाओढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत 9 जानेवारीला दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार आहे. पण त्यापूर्वीच जागावाटपावरुन इंडिया आघाडीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत काहीसा वाद होत असल्याचं चित्र आहे. 


जोपर्यंत इंडिया आघाडीच्या जागावाटप संदर्भात अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही जागांसंदर्भात वक्तव्य करू नका, असा थेट इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासोबत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीसुद्धा काँग्रेस आग्रही असल्याचं एकूण चित्र आहे. त्यामुळे जागावाटप फारसं सोपं नसणार, हे मात्र नक्की.  


काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गिरगावातील एका कार्यक्रमात बोलताना दक्षिण मुंबईची जागा आपलीच आहे आणि आपलाच उमेदवार इथे उभा राहणार, असं वक्तव्य केलं. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तसेच, ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनीही दक्षिण मुंबईतील जागेवर आपला दावा  सांगितला आहे. 


ईशान्य मुंबईपाठोपाठ काँग्रेस दक्षिण मुंबईसाठीही आग्रही 


ठाकरे गटाच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य ऐकल्यानंतर दिल्लीत 9 जानेवारीला जरी इंडिया आघाडीची राज्यातील जागावाटपसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होत असली, तरी हे जागावाटप फारसं सोपं नसणार, हे स्पष्ट दिसत आहे. कारण संजय निरुपम नंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीसुद्धा एक प्रकारे मुंबईतील आणखी एका जागेवर दावा केला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटानं मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभा जागांवर आपला दावा सांगितला असताना यामधील उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील दोन जागांवर काँग्रेस नेत्यांकडून दावा करण्यात आला आहे. जागा वाटपावर कुठलाही निर्णय झाला नसताना शिवसेना ठाकरे गटानं कुठलीही वक्तव्य किंवा दावा सांगू नये, असा थेट इशाराच शिवसेना ठाकरे गटाला मिलिंद देवरा यांनी दिला आहे. 


ज्या दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे, या जागा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये संजय निरुपम यांच्या शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र खासदार असो किंवा नसो मागील पन्नास वर्षांपासून ही जागा काँग्रेस लढवत आली आहे. देवरा कुटुंबीयांचं इथल्या मतदारांसोबत एक वेगळं नातं आहे, असंही मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. 


शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यातील 23 जागांवर दावा 


शिवसेना ठाकरे गट वारंवार राज्यातील लोकसभेच्या 23 जागांवर दावा जरी करत असला, तरी या दाव्यांवर काँग्रेसचे अनेक नेते आक्षेप घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस आग्रही असलेल्या जागांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना तिढा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय कधी होतो, यावर इच्छुक उमेदवार आणि इंडिया आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं विशेष लक्ष असणार आहे. 


दरम्यान, राज्यातील इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या निर्णयावर जेव्हा शिक्कामोर्तब होईल, तेव्हा कदाचित जागांवर होणारे दावे प्रतिदावे बंद होतील. पण जरी बंद झाले, तरी उमेदवारांची नाराजी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष नेत्यांना दूर करून एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. त्याची तयारी सर्व उमेदवारांना ठेवावी लागेल, असंच सध्या निर्माण झालेल्या चित्रातून दिसत आहे.