यवतमाळ: 'मेरी  झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडणूक लढणारच आणि महायुतीने दुसरा उमेदवार दिल्यास त्याला विरोध करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. या मतदारसंघातून महायुती भावना गवळी यांचा पत्ता कट करणार असून त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याच्या चर्चा आहेत.


भावना गवळी यांना भाजपचा विरोध, सुनील महाराज यांचा दावा


पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी भावना गवळी यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे. भाजपला भावना गवळी या लोकसभेसाठी उमेदरवार नको आहेत, त्यामुळे त्यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचं भाकीत त्यांनी केलंय.  एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना लोकसभेच्या उमेदवार म्हणून स्वतः शिंदे गट आणि भाजपाची पसंती नाही. तसेच लोकांचाही त्यांना मोठा विरोध आहे हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही. 


भावना गवळी यांना आयकराची नोटीस 


खासदार भावना गवळी यांच्यावर या आधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचं चित्र होतं. मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं असल्याची माहिती आहे. कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांचं बँक खातं गोठवलं आहे. 8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. 


कर चुकवगिरीप्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. मात्र खासदार भावना गवळींनी संस्थेचे खातं सील झाल्याची बातमी फेटाळली आहे. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.


यवतमाळ वाशिम शिवसेनेचा बालेकिल्ला


शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. पण यावेळेची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यावेळी शिवसेनामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे. 


पोहरादेवीचे महंत सुनील महाराज या ठिकाणाहून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातल बंजारा समाजाची मतं मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फायदा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा :