WTO 12th Conference : जगभरात कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) उपचारासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या वितरणात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र जागतिक व्यापार संघटना आपली भूमिका याकाळात चोख बजावू शकला नाही, असं म्हणत भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डब्ल्यूटीओच्या कारभारावर टीका केलीय. महामारीच्या काळात जागतिक व्यापार संघटनेच्या व्यासपीठाचा नीट वापर झाला नाही. कोव्हिड काळात विकसनशील देश आणि अल्प विकसित देशांच्या लोकांसोबतच हिताचेही रक्षणही आपण करु शकलो नाही. याच्यावर विकसित देशांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हणत गोयल यांनी निशाणा साधला.
जिनेव्हात जागतिक व्यापार संघटनेच्यावतीने तीन दिवसीय मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाच्या समारंभावेळी त्यांनी भारताची भूमिका अन्नधान्य सुरक्षा, व्हॅक्सिन, मासेमारी आणि महत्त्वाच्या चर्चा होणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर भारताची भूमिका स्पष्ट केली. वेगाने वाढणारे अन्नधान्य महागाईचे संकट वैश्विक रुप धारण केले असून ही चिंतेची बाब आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किंमती लाखो लोकांचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत. सोबतच गरीब, कमकुवत देश आणि त्यांच्या नागरिकांना अपूर्ण बाजारपेठांच्या अधीन ढकलत आहे. सार्वजनिक अन्नधान्य साठवणुकीच्या विषयावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे अशी सर्वप्रथम भारतानं व्यासपीठावर भूमिका मांडली आहे.
पियुष गोयल यांनी भारताची ताकद दाखवत एक आत्मविशवास व्यक्त केला. यावेळेस भारत एक ताकद म्हणून परिषदेत उभ राहिले. ताकत जी गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, गरीब देशांच्या हक्कासाठी लढणार आहे. जगातला कोणती ही ताकद भारताला त्यांच्या अजेंडापासून मागे ढकलू शकणार नाही.’
भारतात होणारी पारंपारिक मासेमारी आणि मत्स्यपालनामुळे मोठा फायदा होतो. प्रामुख्याने, प्रजननादरम्यान, मच्छीमार समुद्रात मासेमारीला जात नाहीत. त्यामुळे माशांच्या प्रजातींची संख्या कमी होत नाही. ज्यामुळे समुद्री पर्यावरणीय संतुलन राखले जाते असं म्हणत विकसनशील देशांच्या मासेमारीच्या अनुदानाला पाठिंबा देऊ केलाय. सोबतच, काही देशांनी महासागरांचे शोषण केले असून अनुदानामुळे जागतिक मासे-साठा कमी झालाय आणि अशा देशांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा आक्रमक पवित्रा भारतानं मंत्रिस्तरीय परिषदेत ठेवलाय. उरुग्वे फेरीच्या चुका आपण शेतीत, मत्स्यपालन करारात पुन्हा करू नये अशी भूमिका गोयल यांनी मांडलीय. अन्न सुरक्षा आणि पोटातील भूक मिटवण्यासाठी शाश्वत मासेमारी देखील शेती इतकीच महत्त्वाची आहे असं देखील गोयल म्हणालेत.
भारताचा ठाम विश्वास आहे की जागतिक व्यापार संघटना (WTO) ने पर्यावरण, हवामान बदल आणि जेंडर यांसारख्या गैर-व्यापार संबंधित विषयांवर नियम बनवू नयेत अशी देखील भूमिका भारतानं मांडलीय. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या “लाइफस्टाइल फॉर ॲन्व्होरमेंट (LiFE)" च्या आवाहनाचा पुनरुच्चारही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी परिषदेच्या मंचावर केला.