Prophet Muhammad remarks row : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात ठिकठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, आंदोलन सुरु आहेत. यामध्ये सोशल मीडियामधून आणखी तेल ओतलं जातेय. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणाची परिस्थिती चिघळत आहे. यातच आता या प्रकरणाआडून भारताला बदनाम करण्याचा कट पाकिस्तान रचत आहे. पाकिस्तानमधून अनेक ट्विटर खाते सक्रिय झाले असून पैगंबर मोहम्मद यांच्याबाबतच्या वक्तव्यासंदर्भात अफवा पसरवण्याचं काम करत आहेत. डिजिटल फॉरेंसिक रिसर्च अॅण्ड अनालिटिक्स सेंटर (DFRAC) यांच्या एका रिपोर्ट्सनुसार, संबधित हॅशटॅगचा वापर करुन ट्वीट करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानमधील ट्विटर खात्याचा अधिक समावेश आहे. 


60 हजार पेक्षा जास्त युजर्स सक्रिय - 
DFRAC च्या रिपोर्ट्सनुसार,  60 हजार पेक्षा जास्त ट्विटर युजर्स पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत मुद्द्यावरील हॅशटॅग वापरुन ट्वीट करत आहेत. या ट्वीटमधून अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.  60 हजार पेक्षा जास्त ट्विटर खाती विविध देशातून हाताळण्यात येत आहेत. या सर्व खात्यावरुन एकसारख्या हॅशटॅगचा वापर केला जातो. यामध्ये सर्वाधिक 7100 खाती पाकिस्तानमधून कार्यरत आहेत.


अनेकांनी अफवा पसरवल्या अन् चुकीच्या बातम्या चालवल्या -  
DFRAC नुसार, पाकिस्तानमधील आर्य समाचारसह अन्य प्रसारमाध्यमांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीच्या बातम्या चालवल्या. ओमानमधील ग्रँड मुफ्ती यांनी भारतीय उत्पादनावर बहिष्कार घालण्याची घोषमा केली. तसेच पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल यांनीही चुकीचा दावा केला. ते म्हणाले की, भाजपमधून हाकलपट्टी करण्यात आलेले नवीन जिंदल हे प्रसिद्ध उद्योगपती जिंदल यांचे भाऊ आहेत.  त्याशिवाय इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतलाय. 


या हॅशटॅगचा केला वापर - 
ट्विटर अथवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #Stopinsulting_ProphetMuhammad, #boycottindianproduct या हॅशटॅगचा सर्वाधिक वापर करण्यात आलाय. या हॅशटॅगचा वापर करत दोन समाजात तेढ अथवा अफवा पसरवण्याचं काम करण्यात आलाय. खालिद बेदौनने #BoycottIndianProduct या हॅशटॅगचा वापर करत अनेक ट्वीट केले. या मुद्दयामध्ये काश्मीर मुद्दायाला खेचलं.