H3N8 Bird Flu : H3N8 बर्ड फ्लूमुळे जगात पहिला मृत्यू (H3N8 Bird Flu Death) झाला आहे. मानवांमध्ये दुर्मिळ असलेल्या बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) चीनमधील (China) महिलेचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मरण पावणारी ती पहिली व्यक्ती ठरली आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) म्हटले आहे. पण हा स्ट्रेन लोकांमध्ये पसरताना दिसत नाही. डब्ल्यूएचओने मंगळवारी (11 एप्रिल) उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "ग्वांगडोंगच्या दक्षिणेकडील प्रांतातील 56 वर्षीय महिला  H3N8 एव्हियन इन्फ्लूएंझाच्याने संक्रमित होणारी तिसरी व्यक्ती होती. या स्ट्रेनचा संसर्ग झालेले तिन्ही रुग्ण चीनमधील आहेत. त्यापैकी दोन रुग्णांची मागील वर्षी नोंद करण्यात आली होती."


संबंधित महिला न्युमोनियाग्रस्त होती. याशिवाय तिला इतरही काही आजार होते. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथेच तिचा मृत्यू झाला, असं डब्लूएचओने सांगितलं.


आजारी पडण्यापूर्वी महिला वेट बाजारात गेली होती


आजारी पडण्यापूर्वी ही महिला एका वेट बाजारात (चीन आणि आग्नेय आशियातील ताजे मांस, मासे आणि इतर उत्पादने विकणारी बाजारपेठ)  गेली होती. या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी केली असता ते इन्फ्लूएंझा A (H3) पॉझिटिव्ह होते. इथूनच संसर्ग झाल्याची शक्यता आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं. परंतु तिच्या घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान H3N8 हा मानवांमध्ये दुर्मिळ असला तरी तो पक्ष्यांमध्ये सामान्य आहे. त्याचा संसर्ग इतर सस्तन प्राण्यांनाही झाला आहे. आता पहिल्यांदाच या विषाणूमुळे एखाद्या माणसाचा मृत्यू झाला आहे.


संक्रमित महिलेच्या संपर्कात इतर रुग्ण नाहीत


दरम्यान, H3N8 चा संसर्ग झालेल्या महिलेच्या संपर्कात इतर कोणी आढळले नाही, असं डब्ल्यूएचओने सांगितलं. डब्ल्यूएचओने निवेदनात म्हटलं आहे की, उपलब्ध माहितीच्या आधारे असं दिसून येतं की, या विषाणूमध्ये एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरण्याची क्षमता नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवांमध्ये पसरण्याचा धोका कमी मानला जातो. 


2022 मध्ये, पहिल्यांदाच मानवांमध्ये H3N8 विषाणू पसरल्याचं समोर आलं होतं. संशोधकांचं म्हणणं होतं की विषाणूच्या आधीचा स्ट्रेन साथीच्या रोगास कारणीभूत ठरु शकतो, ज्याला 'एशियाटिक फ्लू' किंवा 'रशियन फ्लू' देखील म्हणतात.


हेही वाचा


H3N8 Bird Flu : पहिला मानवी बर्ड फ्ल्यूचा रुग्ण सापडला; H3N8 चा कितपत धोका? जाणून घ्या