First Human Case of H3N8 Bird Flu : एकीकडे कोरोनाच्या नव्या XE व्हेरिएंटमुळे चीनची चिंता वाढली आहे. दुसरीकडे याच कोरोना संसर्गादरम्यान हेनान प्रांतातील एका व्यक्तीमध्ये H3N8 स्ट्रेन बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीन सरकारने या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.

NHC ने केले स्पष्ट

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) सांगितले की, लोकांनी याबद्दल घाबरण्याची गरज नाही. हा संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे. अधिका-यांनी सांगितले की, हे पहिले प्रकरण एका मुलामध्ये आढळून आले आहे. एका चार वर्षाच्या मुलामध्ये तापासह इतर अनेक लक्षणे दिसून आली. चाचणी केल्यावर त्यात बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेन संसर्ग झाला असल्याची पुष्टी झाली.

घरी जनावरांच्या संपर्कात आल्यानंतर आजारी 

NHC च्या माहितीनुसार, या मुलाच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळला नाही. संसर्ग झालेला मुलगा त्याच्या राहत्या घरी पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता. अशा स्थितीत या काळात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

धोका नाही

चीनच्या आरोग्य विभागाने सांगितले की, H3N8 ची प्रकरणे आतापर्यंत घोडे, कुत्रे, पक्षी आणि सीलमध्ये ही लक्षणं आढळून आली आहेत, परंतु मानवांमध्ये आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे. त्यांनी असेही सांगितले की, या विषाणूमध्ये अशी लक्षणे आढळली नाहीत, जसे की ते एकमेकांपासून पसरतात आणि महामारीचे रूप घेतात. तरीही आमची एक टीम त्यावर लक्ष ठेवून आहे.

अशी घ्या काळजी?आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पक्षांना हात लावू नये, किंवा त्यांचे शवविच्छेदन करु नये. याबरोबरच या पक्षांची परस्पर विल्हेवाट लावू नये.  

..तर बर्ड फ्लूचा विषाणू होईल निष्क्रीय

बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. अंडी किवा कोंबडीचे मांस 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे. शिवाय बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.