World Population Day 2021 : जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने याची दखल घेवून 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.
वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कुटुंबनियोजन, गरीबी, लैंगिक समानता, मानसिक आरोग्य, नागरी अधिकार आणि इतरही विषयांवर चर्चा केली जाते.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करताना दरवर्षी एका थीमवर काम केलं जातं. यावर्षी “Rights and Choices are the Answer: Whether baby boom or bust, the solution to shifting fertility rates lies in prioritising all people's reproductive health and rights" अशी थीम आहे.
जगभरातील महिलाना, विशेषत: विकसनशील आणि विकसित देशांतील महिलांना लैंगिक सुख आणि मुलांना जन्म देण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. तसेच महिलांचे आरोग्याची स्थितीही फारशी काही चांगली नाही. त्यामुळे या वर्षी या मुद्द्यावर जगभरात जागरुकता निर्माण केली जात आहे.
लोकसंख्या ही त्या-त्या देशाची ताकत असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संथगतीने होतो. अशा देशांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. वाढत्या लोकसंख्येला जगवण्यापासून ते नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसला आहे.
सन 2011 मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्जपर्यंत पोहोचली. सध्या जगाची लोकसंख्या ही 7.7 अब्ज इतकी असून 2030 मध्ये ती 8.5 अब्ज तर 2050 मध्ये ती 9.7 अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या 10.9 अब्जचा टप्पा पार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :