लखनऊ : उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखाच्या निवडणुकीचा धामधुम सुरु झाली आहे. त्यामध्ये वादावादी, हाणामारीपासून ते गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच एका महिलेला ब्लॉक प्रमुखपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरु दिला जात नाही, पोलिसांच्या समोरच तिची अडवणूक करुन कपडे फाडल्याच्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एका महिलेला अर्ज भरु न देण्यासाठी भाजपने सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या म्हणतात की, "या आधी एका बलात्कार पीडितेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी तिला आणि तिच्या परिवाराला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता एका महिलेला निवडणुकीतील अर्ज भरण्यापासून थांबवण्यासाठी भाजपने सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. सरकारही तेच आहे आणि व्यवहारही तोच आहे."
लखीमपुर खेरीमधील महिलेशी गैरवर्तन
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारपासून अनेक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ब्लॉक प्रमुखाच्या निवडणुकीमध्ये मारहाणीपासून ते गोळीबारापर्यंतच्या सर्व आयुधांचा वापर करण्यात येत आहे. त्यातच लखीमपूर खेरी या ठिकाणी एका महिलेशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला आहे. आपला अर्ज भरायला जाताना त्या महिलेला अनेक कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान त्या महिलेचे कपडेही फाटले आहेत. या वेळी तिथे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्या महिलेशी गैरवर्तन करणारे कार्यकर्ते हे भाजपचे असल्याचा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केला आहे.
या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची दखल घेत क्षेत्राधिकारी आणि केंद्र प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्या महिलेशी गैरवर्तन करणारे कार्यकर्ते हे अपक्ष उमेदवाराचे समर्थक असल्याचं सांगत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :