NASA Psyche Mission : अंतराळात अद्यापही अनेक रहस्य दडलेली आहेत. यासाठी जगभरातील देश विविध संशोधन करत आहेत. आता नासा आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नासाने अंतराळातील सोन्याचा साठा शोधला असून तेथे आता मोहिम पाठवण्याची तयारी सुरु आहे. मंगळ आणि गुरू यांच्यातील एका लघुग्रहाकडे सध्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. हा लघुग्रह 16 सायकी या नावाने ओळखलं जात आहे.
नासा अंतराळात खास मोहिम पाठवणार
16 सायकी हा लघुग्रह मौल्यवान धातूंपासून बनलेला आहे. काही महिन्यांआधीच अमेरिकन अंतराळ संस्था नासाने या लघुग्रहावर मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा दावा केला होता. हा मौल्यवान साठा मानवाच्या हाती लागल्यास संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील. हे उल्कापिंड मौल्यवान धातू आणि खनिजांपासून बनलेलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या लघुग्रहाची किंमत पृथ्वीवरील सर्व एकूण संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान असू शकते.
मौल्यवान धातूंपासून बनलेला उल्कापिंड
नासा आपल्या सूर्यमालेत असलेल्या या मौल्यवान धातूच्या लघुग्रहावर संशोधनासाठी एक अवकाशयान पाठवणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सायकी नावाचं या लघुग्रहाचा संबंध इतर ग्रहांच्या निर्माणाशी असू शकते. यामुळे सूर्यमालेतील रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रह यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यात आहे. हा लघुग्रह पूर्णपणे धातूपासून बनलेला आहे. नासा सायकी लघुग्रहावर अंतराळयान पाठवणार आहे. याआधी, नासाने पृथ्वीच्या जवळ असलेल्या आणि पृथ्वीसाठी धोका ठरू शकणार्या बेन्नू लघुग्रहासंदर्भात एक मोहीम राबवली होती.
अंतराळात कुठे सापडली 'सोन्याची खाण'?
मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये 16 Psyche नावाचा लघुग्रह आहे. बटाट्याच्या आकाराचा हा लघुग्रह सोने, मौल्यवान धातू प्लॅटिनम, लोखंड आणि निकेलपासून बनलेला असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्यापासून बनवलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 226 किमी आहे. या लघुग्रहावर भरपूर लोह असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
बटाट्याच्या आकाराचा लघुग्रह
इटालियन खगोलशास्त्रज्ञ अॅनिबेल डी गॅस्परिस यांनी 17 मार्च 1852 रोजी सायकी या लघुग्रहाचा शोध लावला. हा लघुग्रह सौरमालेतील सर्वात मोठ्या धातूच्या लघुग्रहांपैकी एक आहे. नासाच्या मते, हा लघुग्रह बटाट्याच्या आकाराचा आहे. त्याची कमाल रुंदी 280 किमी आणि लांबी 232 किमी आहे. सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील एक्सोलिथ प्रयोगशाळेचे विज्ञान सल्लागार डॉ. जो लँड्समन म्हणाले की, सायकी लघुग्रह लोह, निकेल आणि इतर धातूंनी बनलेला असल्याचं रडार आणि दुर्बिणीच्या निरीक्षणातून दिसून आलं आहे.