WHO : WHO चे रोसमुंड लुईस (Rosamund Lewis ) यांनी मंकीपॉक्स लसीबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणतात की, मंकीपॉक्स लस 100 टक्के प्रभावी नाही. अशा परिस्थितीत आता लोकांनी संसर्गाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरातील 92 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 35,000 हून अधिक रुग्ण आढळून आली असताना त्यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, या आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. लुईस म्हणाले की, मंकीपॉक्स रोखण्यासाठी या लसी "100 टक्के प्रभावी" असतील असा दावा WHO करत नाही.
लस हा संपूर्ण उपाय नाही - WHO
लुईस पुढे म्हणाले की, मंकीपॉक्सवर लस हा पूर्ण उपाय नाही. तसेच याचा धोका कमी करण्यासाठी लसींवर अवलंबून राहू शकत नाही. सर्व लोकांनी या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.
युरोप-अमेरिकेत मंकीपॉक्सची वाढती रुग्णसंख्या
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सची 7,500 रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी मागील आठवड्यापेक्षा 20 टक्के जास्त आहे. युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली जात आहे.
या लोकांना धोका जास्त
बहुतेक लोक सहसा उपचार न करता काही आठवड्यांतच मंकीपॉक्सपासून बरे होतात. त्याची लक्षणे सुरुवातीला फ्लूसारखी असतात, जसे की ताप, थंडी वाजून येणे. डब्ल्यूएचओच्या मते, हा विषाणू लहान मुले, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये अधिक गंभीर असू शकतो.
विशेषत: प्राण्यांमध्ये आढळणारा व्हायरस
मंकीपॉक्स व्हायरस त्वचा, श्वसनमार्ग, डोळे, नाक, तोंड आणि शरीरातील द्रवपदार्थांद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. मंकीपॉक्स हा एक जूनोटिक डिजीज आहे. जो विशेषत: प्राण्यांमध्ये आढळतो, तसेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागात आढळतो.
भारतात 10 जणांना मंकीपॉक्सची लागण
देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या