Monkeypox Outbreak : कोरोनानंतर आता मंकीपॉक्स विषाणूचा धोका वाढत चालला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी बुधवारी मंकीपॉक्स विषाणूची जगाभरातील स्थितीची माहिती दिली. गेल्या आठवड्यात मंकीपॉक्स विषाणूचे 20 टक्के रुग्णांची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात 92 देशांमध्ये मंकीपॉक्सचा फैलाव झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. जगभरात मंकीपॉक्सचे 35 हजारांहून अधिक रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. मंकीपॉक्समुळे धोका अधिक वाढत आहे, त्यामुळे लवकरात लवकर लस तयार होणं गरजेचं असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी सांगितलं. 


मंकीपॉक्सच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 92 देशात मंकीपॉक्सचे 35 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.  त्याशिवाय आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. 






जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस म्हणाले की, 'गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सचे तब्बल 7500 रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मंकीपॉक्सचा नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे. ' 


मंकीपॉक्स विषाणूची नावे - 
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स विषाणूच्या व्हेरियंटच्या नावाची घोषणा केली होती. WHO ने मंकीपॉक्स विषाणूच्या व्हेरियंटला क्लॅड I, क्लॅड II ए आणि क्लैड II बी अशी नावे दिली आहेत. यामध्ये II बी वर्ष 2022 मध्ये पसरला आहे.  






भारतात 10 जणांना मंकीपॉक्सची लागण
देशात मंकिपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळले आहेत,  तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. दिल्ली आणि केरळमधील प्रत्येकी एका रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणे काय?
सामान्यत: ताप, डोकेदुखी, तीन आठवड्यांपर्यंत पुरळ, घसा खवखवणे, खोकला आणि फोड ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत.   फोड साधारणपणे ताप आल्‍यानंतर एक ते तीन दिवसांच्‍या आत सुरू होतात, सुमारे दोन ते चार आठवडे टिकतात आणि उपचार सुरू राहेपर्यंत अनेकदा वेदनादायक असतात. त्यांना खाजही येते. मंकीपॉक्स विषाणूचा तळवे आणि तळवे यांच्यावर विशेष प्रभाव पडतो.