Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत केलेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठण करत असताना स्फोट झाला. काबूलमध्ये या स्फोटानंतर दहशतीचं वातावरण आहे. हा स्फोट मगरिबच्या नमाजाच्या वेळी झाला, ज्यामध्ये मशिदीचे इमाम अमीर मोहम्मद काबुली हे देखील ठार झाले. तालिबानचं सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तालिबानचा प्रतिस्पर्धी आयएसने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्यामागे त्याच दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. या स्फोटानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. 


स्फोटाची माहिती देताना काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले होते की, काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यांनी सांगितलं होतं की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. या स्फोटात मशिदीचे मौलवी अमीर मोहम्मद काबुली यांचाही मृत्यू झाला असल्याचं त्यांनी काल सांगितलं होतं.



आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये मशिदींना लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आतापर्यंत शिया मशिदींना आईएस या दहशतवादी संघटनेकडून लक्ष्य केले जात होते. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही.


दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. अलीकडेच तेथे तालिबान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवरून हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. गेल्या काही महिन्यांत तालिबानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी काबूलमधील एका मशिदीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी अफगाणिस्तानातील गुरुद्वारांनाही लक्ष्य करण्यात आले होते.



इतर महत्वाच्या बातम्या