Pulitzer Award : अमेरिकन-हंगेरियन पत्रकार जोसेफ पुलित्झर (Joseph Pulitzer) यांचा आज स्मृतीदिन (March 4, 1885 - April 10, 1886) आहे. हे पत्रकारिता क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने पत्रकारितेतील नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पत्रकारिता ( Journalism ), पुस्तके ( Books ), नाटक ( Drama ) आणि संगीत ( Music ) क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी देण्यात येतो. जोसेप पुलित्झर हे वृत्तपत्र संपादक होते.


'पुलित्झर पुरस्कार' हा अमेरिकन-हंगेरियन पत्रकार जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने अमेरिकेत दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. जगभरात वृत्तपत्र, पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पाच सदस्यांची समिती या पुरस्कारांची निवड करते. 4 जून 1917 रोजी पहिल्यांदा याची घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार एकूण 21 श्रेणींमध्ये दिला जातो. यासोबतच शिष्यवृत्तीही दिली जाते. हा पुरस्कार मिळलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि 10 हजार डॉलर्स रोख रक्कम दिली जाते. 



कोण होते जोसेफ पुलित्झर? ( Who is Joseph Pulitzer )


जोसेफ पुलित्झर हे हंगेरियन-अमेरिकन राजकारणी आणि पत्रकार होते. सेंट लुई पोस्ट-डिस्पॅच ( St. Louis Post-Dispatch ) आणि न्यूयॉर्क वर्ल्ड ( The New York World ) वृत्तपत्राचे ते संपादक होते. ते डेमोक्रॅटिक पक्षातील एक प्रमुख नेते होते. 


जोसेफ पुलित्झर यांच्या मृत्यूनंंतर पुलित्झर पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. जोसेफ पुलित्झर यांनी देणगी देत कोलंबिया विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु करण्याची आणि वार्षिक पुरस्कार जाहीर करण्याची इच्छा त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिली होती. त्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे 1912 मध्ये कोलंबिया स्कूल ऑफ जर्नलिझमची स्थापना झाली. त्यानंतर 1917 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. 


पुलित्झर पुरस्कार मिळविण्यासाठी नामांकनाचं प्रवेश शुल्क म्हणून 75 डॉलर भरावे लागतात आणि याशिवाय समितीने घालून दिलेल्या अटींचीही पूर्तता करावी लागते.


पुलित्झर पुरस्कार यादीतील भारतीय पत्रकार


2022 साली चार भारतीय पत्रकारांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला. यामध्ये मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले दानिश सिद्दीकी यांच्यासह अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे यांचा समावेश आहे.


रॉयटर्सचे दिवंगत पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. रॉयटर्सचे छायाचित्रकार ( Photo Jouralist ) दानिश सिद्दीकी गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात मारले गेले होते.


अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांच्या कोरोनाच्या काळात भारतातील फोटोग्राफीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. 


'या' भारतीयांना मिळाला पुलित्झर पुरस्कार



  • अमेरिकेतील गदर पार्टीचे सदस्य, भारतीय-अमेरिकन पत्रकार गोविंद बिहारी लाल, 1937 मध्ये पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले होते.

  • 2003 मध्ये, मुंबईत जन्मलेल्या गीता आनंद यांना कॉर्पोरेट भ्रष्टाचाराच्या अहवालासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार होत्या. 

  • 2016 मध्ये भारतीय-अमेरिकन पत्रकार लॉस एंजेलिस टाईम्सच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संपादक संघमित्रा कलिता यांना ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग प्रकारात पुलित्झर देण्यात आला होता. कलिता यांना 2015 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये सॅन बर्नार्डिनो शूटिंगच्या कव्हरेजसाठी पुरस्कार देण्यात आला.

  • 2000 मध्ये लंडनमध्ये जन्मलेल्या भारतीय-अमेरिकन लेखिका झुंपा लाहिरी यांना त्यांच्या पहिल्या लघुकथासंग्रहासाठी फिक्शनमधील पुलित्झर पुरस्कार मिळाला.

  • 2011 मध्ये भारतीय-अमेरिकन लेखक सिद्धार्थ मुखर्जी यांना The Emperor of All Maladies : अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर या कादंबरीसाठी जनरल नॉन-फिक्शनसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला.

  • 2020 मध्ये, असोसिएटेड प्रेसचे चन्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासीन यांना फिचर फोटोग्राफी श्रेणीमध्ये पुलित्झर देण्यात आला.