Omicron Variant : भारतात कोरोनाची त्सुनामी सुरु झाली आहे. तर जगभरातल्या अनेक देशांत ओमायक्रॉनची अशी लाट आधीच आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडनॉम घेबियस यांनी गुरुवारी म्हटलं की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर आहे. विशेषतः लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांसाठी हा कमी गंभीर ठरतो. पण तरीही ओमायक्रॉनला सौम्य समजणं चूक असेल.
टेड्रोस यांनी इशारा देताना म्हटलं की, ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागत आहे. तसेच या व्हेरियंटनं अनेकांचा जीवही घेतला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्यक्षात नव्या व्हेरियंटनं संसर्ग झालेल्या रुग्णांची त्सुनामी इतकी मोठी आणि वेगवान आहे की, जगभरातील आरोग्य यंत्रणांवर त्याचा परिणाम होत आहे.
डॉ. ट्रेडोस पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्या पिढीतील लसी सर्व संक्रमण आणि प्रसार रोखू शकत नाहीत, परंतु या विषाणूपासून हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी या अत्यंत प्रभावी आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, लसीकरणासोबत (Vaccination) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणं, अंतर ठेवणं, गर्दी टाळणं यांसारख्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
70 टक्के लोकसंख्येचं पूर्णपणे लसीकरण
सध्याच्या लसीकरणाच्या गतीने, 109 देश त्यांच्या लोकसंख्येच्या 70 टक्के लोकसंख्येचे जुलै 2022 च्या सुरुवातीपर्यंत लसीकरण पूर्ण करतील. गेल्या आठवड्यात महामारी सुरु झाल्यापासून सर्वाधिक आकड्यांची नोंद करण्यात आली आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीनं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुरु असलेल्या पुनरुत्थानाच्या दरम्यान, जागतिक कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 29.7 कोटींवर पोहोचली आहे, तर मृत्यू 54.6 कोटी आणि लसीकरणानं 9.27 अब्जाचा आकडा ओलांडला आहे.
देशात लसीकरणाच्या दीडशे कोटी डोसचा टप्पा पार
संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. या सर्व वातावरणात देशात एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. देशाने कोरोना लसीकरणाचा दीडशे कोटी लसीच्या डोसचा टप्पा पार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी 1,49,57,01,483 लसीकरण पूर्ण केले आहे. ज्यामध्ये 87 कोटी 21 लाख 67 हजार 247 नागरिकांना पहिला डोस आणि 62 कोटी 35 लाख 34 हजार 236 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळी 7 वाजता 85 लाख 32 हजार 595 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- वाढत्या कोरोनावर फुल्ल स्पीड लसीकरणाचा उतारा; देशात लसीकरणाच्या दीडशे कोटी डोसचा टप्पा पार
- महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांचा स्फोट, पाहा कोणत्या राज्यात काय परिस्थिती?
- Coronavirus : अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम, फक्त पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे : सीडीसी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह