Spy Balloon History : 'स्पाय बलून'मुळे (Spy Balloon) अमेरिका (America) आणि चीन (China) या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या आकाशात स्पाय बलून दिसला होता. अमेरिकेने चीनचा हा स्पाय बलून क्षेपणास्त्राचा मारा करत फोडला. त्यानंतर चीनचा तिळपापड झाला आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केल्याचा आरोप चीनकडून करण्यात येत आहे. अमेरिकेच्या आकाशात गेल्या काही दिवसांपासून स्पाय बलून उडताना दिसत होता. स्पाय बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. पण, चीनने हे आरोप फेटाळत हवामानासंबधित माहिती देणारा हा बलून माहिती गोळा करण्यासाठी असल्याचा दावा केला.
स्पाय बलूनमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला
अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडल्यावर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बलून फोडल्याची अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा धमकीवजा इशारा चीनने दिला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, सध्या स्पाय बलूनची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. स्पाय बलून म्हणजे नक्की काय आणि याचा वापर कशाप्रकारे केला जातो, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
विश्वयुद्धामध्येही स्पाय बलूनचा वापर
तज्ज्ञांच्या मते, स्पाय बलूनचा मोठा इतिहास आहे. उपग्रहांच्या (Satellite) काळातही स्पाय बलूनचा (Spy Balloon) वापर केला जात आहे. स्पाय बलूनचा अर्थ हेरगिरीसाठी वापरण्यात येणारा फुगा. स्पाय बलूनद्वारे क्लोज-रेंज मॉनिटरिंग म्हणजेच अत्यंत जवळून निरीक्षण केले जाते. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विज्ञानाचे प्राध्यापक इयान बॉयड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हे फुगे हेलियम वायूने भरलेले असल्यामुळे वजनाने अतिशय हलके असतात.
स्पाय बलूनची वैशिष्ट्ये
हेरगिरीसाठी स्पाय बलूनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले असतात. हे फुगे एखाद्या क्षेत्राचा दीर्घकाळ अभ्यास करू शकतात, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जमिनीवरून ज्या क्षेत्राचे निरीक्षण करणे खूप कठीण आहे, त्या क्षेत्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पाय बलून जमिनीपासून जास्त उंचीवर उडू शकतात, म्हणून त्यांचा वापर हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. तसेच, हेरगिरीसाठी हे फुगे उपग्रहांपेक्षा (Satellite) सरस ठरतात. कारण ते उपग्रहांपेक्षा एखादे क्षेत्र अधिक सहजपणे आणि जास्त काळ स्कॅन करू शकतात.
स्पाय बलूनचा इतिहास
1800 च्या दशकात स्पाय बलूनचा वापर करण्यात आला होता. 1859 मध्ये फ्रँको-ऑस्ट्रियन युद्धादरम्यान फ्रान्सने पाळत ठेवण्यासाठी या फुग्यांचा वापर केला. 1861 ते 1865 च्या अमेरिकन गृहयुद्धातही स्पाय बलून वापरण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात स्पाय बलूनचा वापर झाला, ही अतिशय सामान्य बाब होती. जपानी सैन्याने अमेरिकेवर बॉम्ब टाकण्यासाठी स्पाय बलूचा वापर केला. दुसऱ्या महायुद्धानंतर, अमेरिकन सैन्याने जास्त उंचीवरील स्पाय बलूनचा वापर सुरू केला. सरकारी कागदपत्रांनुसार, 1950 च्या दशकात फोटोग्राफिक फुगे सोव्हिएत ब्लॉकच्या प्रदेशावर उडवले गेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या