Pervez Musharraf Died : पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुशर्रफ यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जनरल मुशर्रफ यांनी कारगिल युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. कारगिल युद्धावेळी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांनीच कारगिल युद्धाची योजना आखली होती. कारगिल युद्धाची संपूर्ण योजना मुशर्रफ यांनीच आखली होती. खुद्द पाकिस्तान सरकारही त्यातील अनेक बाबींबद्दल माहिती नव्हती.


मुशर्रफ यांनीच आखलेला कारगिल युद्धाचा कट


तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळालाही कारगिल युद्धाबाबत सुरुवातीला माहिती नव्हती. एवढंच नाही तर जनरल मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाबाबत तिनही लष्करांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुशर्रफ यांच्या कारगिल युद्ध आणि योजनेबद्दल पाकिस्तानी हवाई दल आणि नौदलाला फारशी माहिती नव्हती. भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यावर जनरल मुशर्रफ यांच्या या कटाचा फटका पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना बसला.


पाकिस्तानी पंतप्रधानांना धोका


पाकिस्तानी लष्कर जिहादीच्या वेशात नियंत्रण रेषा ओलांडेपर्यंत मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाबाबत त्यांची योजनेची कुणालही माहिती दिली नव्हती. पाकिस्तानी लष्कर जेव्हा कारगिलच्या शिखरावर पोहोचले तेव्हा मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज यांना याची माहिती दिली. मात्र मुशर्रफ यांनी पंतप्रधानांचा विश्वासघात करत त्यांनी खोटी माहिती दिली. कारगिलमध्ये जिहादींनी घुसखोरी केल्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांना सांगण्यात आले.


मुशर्रफ यांची भारताला कमी लेखण्याची चूक


जनरल परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धात भारताला कमी लेखण्याची चूक केली होती. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने कारगिल युद्ध जिंकता येईल, असा मुशर्रफ यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी पाकिस्तानी नौदल आणि हवाई दलाकडून युद्धाबाबत महत्त्वाची माहिती लपवून ठेवली होती. मात्र, भारतीय सैन्याने शौर्य गाजवत कारगिल युद्धात पाकिस्तानला पाणी पाजलं आणि विजय मिळवला. 


कारगिल युद्ध


कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धामध्ये भारताने विजय मिळवला होता. 14 ते 18 हजार फूट उंच शिखरावर भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये भारताचे 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्कराच्या इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.


बंड करून सत्ता काबीज


कारगिल युद्धानंतर पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून परवेज मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली. पाकिस्तानच्या इतिहासात या दिवसाची लष्करप्रमुखांच्या हस्ते बंडाचा दिवस म्हणून नोंद आहे. 1999 मध्ये देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतली होती.