(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई
Khalistani Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात अमेरिकेत एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांला भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचा आरोप आहे.
Khalistani Separatist Pannun : अमेरिकेने एका भारतीय नागरिकावर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या (Gurpatwant Singh Pannun) हत्येचा कट रचल्याचा आरोप करत अटक केली आहे. पन्नूचे नाव न घेता, अमेरिकेने असा दावा केला की त्यांनी शीख धर्मीयांसाठी वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कथित कट उधळून लावला आहे. अमेरिकेने खलिस्तानी दहशतवाद्याच्या (Khalistani Terrorist) हत्येचा कट रचल्याचा आरोप केलेल्या भारतीय नागरिकाचे नाव निखिल गुप्ता (Nikhil Gupta) आहे. निखिल गुप्ताला हे काम भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याने करण्यास सांगितले होते, असा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. निखिलवर सुपारी घेऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हा कट भारतातूनच रचण्यात आल्याचे अमेरिकन वकिलांचे म्हणणे आहे.
अमेरिकेने त्या खलिस्तानींचे नाव उघड केले नाही
या तथाकथित कटात कोणत्या खलिस्तानवादी नेत्याचा कट रचण्यात आला, याची माहिती अमेरिकन न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्ताऐवजात देण्यात आली नाही. मात्र, या खलिस्तानवाद्याचे नाव गुरपतवंत सिंग पन्नू असण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे कॅनडा आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे. भारत सरकारने यापूर्वी सांगितले होते की त्यांनी या कटाच्या संदर्भात अमेरिकेने उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी सुरू केली आहे. व्हाईट हाऊसने हा मुद्दा भारत सरकारकडे वरिष्ठ पातळीवर मांडल्याचे सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांनी आश्चर्यजनक उत्तर दिले असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले.
अमेरिकेचे ऍटर्नी डॅमियन विल्यम्स म्हणाले, "प्रतिवादींनी न्यूयॉर्क शहरातील एका भारतीय-अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचला ज्याने शीखांसाठी सार्वभौम राज्य स्थापनेसाठी जाहीरपणे समर्थन दिले होते. अमेरिकेच्या भूमीवर अमेरिकन नागरिकांच्या हत्येचे प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, असे ते म्हणाले.
कॅनडानेही भारतावर आरोप केले आहेत
अमेरिकेपूर्वी कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. हरदीप सिंग निज्जर यांची सरे काउंटीतील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारताचा या हत्याकांडात हात असल्याचा आरोप केला होता. ट्रुडोचे आरोप फेटाळून लावत भारताने तिखट प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही देशांनी प्रत्येकी एका राजनयिकांची हकालपट्टी केली. पुढे भारताने कॅनडाची व्हिसा सेवाही बंद केली होती.