Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरुच आहे. रशियन बॉम्बहल्ल्यात नष्ट झालेल्या मारियुपोलमधील थिएटरच्या ढिगाऱ्याखालून तिसऱ्या दिवशीही 1,100 हून अधिक लोकांना अद्याप बाहेर काढता आले नाही. थिएटरच्या तळघरात 1300 लोकांनी आश्रय घेतला होता, त्यापैकी फक्त 130 लोकांना बाहेर काढता आले. नाट्यगृह पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. स्थानिक आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर शनिवारपर्यंत मदत आणि बचाव कार्यात कोणतेही मोठे यश मिळालेले नाही. चित्रपटगृहात बहुतांश महिला आणि मुले लपून बसली होती.


जसजसा अधिक वेळ जात आहे, तसतशी ढिगाऱ्यातून लोकांच्या सुरक्षित सुटकेची आशाही संपत येत आहे. शनिवारी स्थानिक खासदारांनी सांगितले की, बचाव पथकावरही रशियाकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मारियुपोलचे महापौर वद्यम बोइचेन्को म्हणाले की, शहरात सर्वत्र रशियन हल्ल्याचे अवशेष आहेत. शहरात असा एकही भाग नाही जिथे रशियन हल्ल्याच्या खुणा नाहीत.


अनेक शहरांमध्ये नागरिकांवर उपासमारीची वेळ
आज रशिया-युक्रेन युद्धाचा 25 वा दिवस आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये संघर्ष सुरू आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहराला रशियाने चारही बाजूंनी वेढा घातला असून तेथे सतत हल्ले सुरू आहे. युक्रेनची न्यूज एजन्सी 'द कीव्ह इंडिपेंडंट'ने दावा केला आहे की डोनेस्तक लष्करी-नागरी प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेन्को यांनी माहिती दिली की रशियन हल्ल्यांपासून वाचण्यात यशस्वी झालेले हजारो मारियुपोल रहिवासी व्याप्त मनहुशी आणि मेलेकिनमध्ये असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रशियन सैन्याने त्यांना अन्न, पाणी देण्यास नकार दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha