Ukraine Russia War : "मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर रशियाने कधीच युक्रेनवर हल्ला केला नसता. असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे. ट्रम्प यंनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.


"रशियाने युक्रेनच्या सीमेवर आपले सैन्य पाठवले त्यावेळी वाटले की पुतिन युक्रेनवर दबाव आणून करार करू इच्छित आहेत. परंतु, रशियाने युक्रेनवर हल्ला केला. व्लादिमीर पुतिन खूप बदलले आहेत आणि जगासाठी ही अत्यंत दुःखाची बाब आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 


डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला वाटले की पुतिन वाटाघाटी करत आहेत आणि युक्रेनच्या सीमेवर सैन्य पाठवणे हा करार करण्याचा एक स्मार्ट मार्ग आहे. परंतु, रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आपल्या कार्यकाळात रशियाबाबत आपण खूप कठोर होतो."


आपल्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांना रशियन राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संबंधांवरून टीकेला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन हे रशियाच्या हल्ल्यावर सातत्याने टीका करत असून त्यांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. युक्रेनला मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणावात आणखी भर पडली आहे.  


24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून युक्रेनचे सैन्य रशियन सैन्यासोबत जोरदार मुकाबला करत आहे. परंतु, या भीषण युद्धामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 30 लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिकांना निर्वासित म्हणून इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.


महत्वाच्या बातम्या