Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी सर्व अमेरिकन खासदारांनी झेलेन्स्की यांना उभे राहून अभिवादन केले. झेलेन्स्की यांनी दुसऱ्या महायुद्धाची आठवण करून देत युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडीओ अमेरिकन संसदेत दाखवला. यावेळी त्यांनी आम्हाला शांतता हवी आहे, हे युद्ध थांबण्यात यावे, अशी मागणी केली.
झेलेन्स्की म्हणाले, आम्हाला युद्ध नको आहे. हे युद्ध थांबवले पाहिजे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. परंतु, रशिया सातत्याने हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. रशियाकडून आमच्या अधिकारांवर हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर आणखी कठोर निर्बंध लादावेत. शिवाय अमेरिकन कंपन्यांनी रशियातून परत यावे.
झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचेही आभार मानले. ते म्हणाले, "आतापर्यंतच्या सर्व मदतीबद्दल मी अमेरिकेचे आभार मानतो. अमेरिकेने रशियासाठी आपली सर्व बंदरे बंद करावीत. रशियाशी युद्ध सुरू असताना युक्रेन कधीही शरण येणार नाही. आपल्या देशाचे भवितव्य दुसऱ्या देशांकडून ठरवले जात आहे. हा केवळ आपल्यावर आणि आपल्या शहरांवरचा हल्ला नाही तर आपल्या जगण्याच्या हक्कावरचा हल्ला आहे. अमेरिकेतील लोकांची स्वप्ने स्वातंत्र्याशी संबंधित आहेत, तशीच स्वप्ने युक्रेनच्या लोकांचीही आहेत."
"अमेरिकेतील लोकांसारखी सामान्य जीवनशैली युक्रेनमधील आमच्या लोकांसाठीही हवी आहे. 1941 ची सकाळ आणि 11 सप्टेंबरचा दिवस अमेरिकेने आठवावा. या दिवशी अमेरिकेवर हल्ला झाला होता. रशियाकडून होत असलेले हल्ले आम्ही थांबवू शकत नाही. आतापर्यंत रशियाकडून युक्रेनवर 1000 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. शिवाय हल्ल्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात, असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.
झेलेन्स्की म्हणाले,"युक्रेनवर नो फ्लाय झोन नियम लागू करू नये. याची अंमलबजावणी झाली तर रशिया आपल्यावर हल्ला करू शकणार नाही. आम्हाला कोणत्या प्रकारची शस्त्रे हवी आहेत हे अमेरिकेला माहीत आहे. अमेरिकेने युक्रेनला मदत करावी. आज जगाकडे युद्ध थांबवण्याचे कोणतेही साधन नाही. हा संघर्ष 24 तासांत थांबवला पाहिजे."
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या 103 मुलांचा मुत्यू, राजधानी कीव्हमध्ये लॉकडाऊन
- Russia Ukraine : रशिया-युक्रेन युद्ध; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन करणार मोठी घोषणा
- Russia Ukraine War: युक्रेनमधील युद्धामुळे दर मिनिटाला एक मूल होत आहे निर्वासित, 14 लाख मुलांनी इतर देशांमध्ये घेतला आश्रय