Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध तिसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. रशियाचे सैनिक युक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने बॉम्ब हल्ला करत आहेत. दोन्ही देशांमधील रक्तरंजित संघर्ष 17 व्या दिवशीही सुरूच आहे. हल्ला तीव्र करत रशिया अनेक शहरांवर प्राणघातक बॉम्ब हल्ला करत आहे. रशियाचे सैन्य आता देशाची राजधानी कीव्हच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. शुक्रवारी पश्चिम भागातील विमानतळांजवळ अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आहे. निरीक्षक आणि सॅटेलाईट फोटोंमध्ये असे निदर्शनास आले आहे की व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य कीव्हच्या बाहेरील परिसरात बराच काळ घेर धरुन होते. राजधानी कीव्हकडे जाणाऱ्या 64 किमी लांबीच्या रशियाच्या ताफ्यातील बहुतांश वाहने हल्ल्याच्या तयारीत आहेत.


मारियुपोलसह अनेक शहरांमध्ये विध्वंस
युक्रेनच्या डनिप्रो येथे रशियाच्या हवाई हल्ल्यानंतर एका लहान मुलाची शाळा आणि निवासी इमारतीला आग लागली. या हल्ल्यात एका नागरिकाचा वेदनादायक मृत्यू झाला. युक्रेनमधील मारियुपोल येथील रुग्णालयात झालेल्या हल्ल्यात तीन जणांनी आपला जीव गमवला आहे. हल्ल्यानंतर रुग्णालयाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. मारियुपोलमध्ये रशियन हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. युद्धाच्या काळात देशातील सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांचे अन्न-पाण्याशिवाय हाल होत आहेत. अन्न आणि पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.


रशियाकडून जोरदार बॉम्ब हल्ला
भीषण बॉम्बस्फोटामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तेथून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर सुरू आहे. युद्धामुळे 25 लाख लोकांना युक्रेन सोडावे लागले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर मारियुपोल शहरामधील सुरक्षित कॉरिडॉरवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. रशियाने रासायनिक शस्त्रे बनवल्याच्या आरोपांना शुक्रवारी प्रत्युत्तर देताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही कोणतीही रासायनिक शस्त्रे बनवली नाहीत आणि जर रशियाने असे केले तर त्यांनी आणखी निर्बंधांसाठी तयार राहावे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha